राजधानी सुपरफास्ट स्पेशल एक्सप्रेसचे इंजिन घसरले; कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक थांबली!


रत्नागिरी – रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि भोके दरम्यान करबुडे बोगदयामध्ये आज (शनिवार) पहाटे ४.१५ वाजता कोकण रेल्वेच्या मार्गावर दरड कोसळल्याने हजरत निजामुद्दीन–मडगाव राजधानी सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या इंजिनाचे पुढील चाक रुळावरून घसरल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक थांबली आहे.

कोकण रेल्वेची यंत्रणा या घटनेनंतर घटनास्थळी तात्काळ रवाना झाली आणि इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर विविध गाड्या विविध स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत.

या घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसून सर्व प्रवासी डबे मार्गावर पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. पुढील काही तासात मार्ग पूर्ववत होईल असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. ऐन बोगद्यात अपघात झाल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या भागातील वाहतूक काही काळ ठप्प राहणार आहे.