सर्वोच्च न्यायालयात ओबीसींचे राजकीय आरक्षण रद्द होणे हे ठाकरे सरकारचे पाप, आशिष शेलार यांचे टीकास्त्र!


मुंबई – सर्वोच्च न्यायलयाने ओबीसी समाजाचं राजकीय आरक्षण रद्द केल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद आता राज्यात उमटू लागले आहेत. एकीकडे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असतानाच आता ओबीसींसाठी राजकीय आरक्षण मिळवण्यासाठी भाजपने आंदोलन सुरू केले आहे. भाजपने आज सकाळपासूनच राज्यातील विविध भागामध्ये चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे.

भाजप आमदार आशिष शेलार यांनी कार्यकर्त्यांसोबत मुंबईतील मुलुंड चेकनाक्याजवळ चक्काजाम आंदोलन सुरू केले असून यावेळी बोलताना त्यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. ओबीसींचे राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द होणे हे ठाकरे सरकारचे पाप असल्याचे आशिष शेलार म्हणाले आहेत.

आशिष शेलार यांनी आंदोलनादरम्यान बोलताना राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. फक्त महाविकासआघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसींना मिळालेले राजकीय आरक्षण गेले आहे. न्यायालयाला हवा असलेला इंपेरिकल डाटा त्यांनी दिला नाही. आयोगाची निर्मिती न केल्यामुळे आरक्षण गेले. हे राजकीय आरक्षण परत मिळवणे हीच भाजपची घोषणा आहे. त्यासाठी आम्ही कोणत्याही थरापर्यंत जाऊ आणि आरक्षण मिळवून देऊ, असे आशिष शेलार म्हणाले आहेत.

दरम्यान, आशिष शेलार यांनी यावेळी बोलताना राज्य सरकारला ओबीसी समाजाला आरक्षण द्यायचेच नसल्याचा आरोप केला. सरकारच्या पदोन्नतीमध्ये आरक्षण देता येणार नसल्याच्या प्रतिज्ञापत्रावर देखील त्यांनी निशाणा साधला. राज्य सरकार आणि विशेषत: ठाकरे सरकार यांना ओबीसींना राजकीय आरक्षण द्यायचेच नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध होते.

ज्या पद्धतीने राज्य सरकारने न्यायालयामध्ये प्रतिज्ञापत्र दिले आहे, ते एका अर्थाने ओबीसींच्या आरक्षणाचे मृत्यूपत्रच आहे. शेकडो, हजारो कार्यकर्त्यांना अटक झाली तरी आम्ही स्वत:ला अटक करून घेऊ. ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षणाशी तडजोड केली जाणार नाही. इम्पेरिकल डाटा देण्यासाठी १५ महिने का लागले? फडणवीस सरकारने काढलेला जीआर व्यपगत का केला? याची उत्तरे सरकारला द्यावी लागतील, असे ते पुढे म्हणाले आहेत.

आशिष शेलार यांनी यावेळी बोलताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेचा देखील समाचार घेतला. काँग्रेस-राष्ट्रवादीचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबाच आहेत. या सरकारने ओबीसींचे राजकीय आरक्षण संपवले आहे. हे पाप ठाकरे सरकारचे आहे. हे राजकीय आरक्षण पुन्हा मिळेपर्यंत भाजपचे आंदोलन दिवसागणिक तीव्र होईल. जनमानसातून मोठी प्रतिक्रिया उमटेल. काँग्रेसचे आंदोलन नौटंकीचा दुसरा प्रकार आहे. या नौटंकीला जनता ओळखते. त्यांनी इम्पेरिकल डाटा गोळा करावा आणि ओबीसीला राजकीय आरक्षण मिळवून द्यावे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने नौटंकी आंदोलन करू नये, असे आशिष शेलार यावेळी म्हणाले.