मुंबई – डेल्टा प्लसचे रुग्ण राज्यात वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा उपाय म्हणून राज्य सरकारने पुन्हा एकदा निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार आता राज्यात कोणत्याही जिल्ह्यामध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या टप्प्यातील शिथिलता नसेल. सर्वच जिल्हे तिसऱ्या टप्प्याच्या वर असणार आहेत. पण, यावरून आता सरकारला धारेवर धरण्यास विरोधकांनी सुरुवात केली आहे. दरम्यान भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाच लक्ष्य केले आहे. त्याचबरोबर दुपारी ४ वाजताच शहराला टाळे लागणार असल्याचा देखील उल्लेख अतुल भातखळकर यांनी केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा कोरोना निर्बंधांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.
राज्यात कोरोनाविषयक नियमावलीमध्ये बदल; अतुल भातखळकरांनी साधला मुख्यमंत्र्यांवर निशाणा
एकीकडे राज्यात अद्यापही ९ ते १० हजारांच्या घरात कोरोनाचे रुग्ण असताना डेल्टा प्लस व्हेरिएंटचे नवे आव्हान उभे राहू लागले आहे. डेल्टा प्लसचे रुग्ण सर्वाधिक आढळणाऱ्या महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि केरळ या राज्यांना केंद्रानं देखील सतर्कतेचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नियमावलीमध्ये महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. पण, त्यावरून सरकारला विरोधकांनी चांगलेच धारेवर धरले आहे.
डेल्टा विषाणूपासून बचाव की, पळ? मुख्यमंत्री @OfficeofUT महाराष्ट्राला पुन्हा 'बंदीराष्ट्र' बनवू पाहताहेत. दुपारी चार वाजताच शहराला टाळं लागणार आहे. रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार आहे. #MahaCovidFailure
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) June 25, 2021
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून सरकारवर निशाणा साधला आहे. डेल्टा विषाणूपासून बचाव की पळ? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राला पुन्हा ‘बंदीराष्ट्र’ बनवू पाहात आहेत. दुपारी चार वाजताच शहराला टाळं लागणार आहे. रोजीरोटीसाठीचा झगडा पुन्हा सुरू होणार असल्याचे आपल्या ट्वीटमध्ये अतुल भातखळकर यांनी म्हटले आहे.