दिल्ली पोलिसांना महागात पडले सुशील कुमारसोबतचे फोटोसेशन


नवी दिल्ली – भारताचा ऑलिम्पिक पदकविजेता कुस्तीपटू सुशीलकुमार सध्या दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमच्या बाहेर सागर धनकर नावाच्या युवा कुस्तीपटूची हत्या झाल्याप्रकरणी अटकेत आहे. पण, त्याच्याभोवतीचे प्रसिद्धीचे वलय अटकेत असतानाही काही कमी होताना दिसत नाही. मंडोली तुरुंगातून तिहार जेलमध्ये शुक्रवारी सुशीलकुमारला हलवण्यात आले. यावेळी दिल्ली पोलिसांनी मंडोली तुरुंगाबाहेर सुशील कुमारसोबत काढलेले फोटो आणि सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता पोलिसांना हे फोटोसेशन चांगलेच महागात पडण्याची शक्यता आहे. कारण या प्रकरणी आता चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

दिल्ली उच्च न्यायालयाने सुशील कुमारला कुस्तीपटू सागर धनकार हत्या प्रकरणात ९ जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दिल्लीच्या मंडोली तुरुंगातून सुशील कुमारला तिहार जेलमध्ये हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. पण, त्याला मंडोली तुरुंगाबाहेर पोलीस व्हॅनमध्ये बसवताना दिल्ली आर्म्ड पोलिसांच्या थर्ड बटालियनच्या पोलिसांनी सुशील कुमारसोबत फोटोसेशन केले. त्यावेळी सुशील कुमारसोबत काही अधिकाऱ्यांनी सेल्फी देखील काढले. हे फोटो सोशल माडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यावर आक्षेप घेतला जाऊ लागला.

सुशील कुमारला असलेला धोका लक्षात घेता त्याच्यासोबत सुरक्षेसाठी विशेष पोलीस पथक देखील तैनात असते. पण, मंडोलीला हे पथक पोहोचल्यानंतर त्यांनी आरोपीसोबत (सुशीलकुमार) फोटो काढण्यास सुरुवात केली. त्याच्यासोबतच्या थर्ड बटालियनच्या पोलिसांना अशा प्रकारच्या हाय रिस्क कैद्यांचे फोटो काढून त्यांच्या वरिष्ठांना पाठवण्याचे निर्देश देण्यात आल्यामुळे त्यांच्यावर नजर ठेवणे शक्य होते. पण, शुक्रवारी त्याच्यासोबतच्या पोलिसांनी त्याच्यासोबतचे फोटो वरिष्ठांना पाठवण्यासोबतच ऑफिसच्या व्हॉट्सअॅप ग्रुप्सवर आणि त्यांच्या नातेवाईकांना पाठवायला सुरुवात केली. त्यामुळे हा प्रकार समोर आला असून त्याच्या अंतर्गत चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

दरम्यान, दिल्ली पोलिसांचे सुशील कुमारसोबत फोटो व्हायरल झाल्यानंतर नेटिझन्सनी देखील त्याला ट्रोल केले होते. त्याला जेलमध्ये विशेष उपचार दिले जात आहेत का? तो जेलमध्ये जातो आहे की ऑलिम्पिकमध्ये? असे प्रश्न देखील काही नेटिझन्सनी उपस्थित केले.