काळजी घ्या, Delta Variants विषयी जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा!


नवी दिल्ली – सध्या जगभरात कोरोनाच्या Delta Plus Variant ची चर्चा सुरू आहे. कोरोनाच्या या नव्या प्रकारामुळे प्रतिकारशक्ती वेगाने निष्प्रभ होत असल्याचे समोर आल्यामुळे या प्रकाराची धास्ती जगभरातील देशांनी घेतली असताना भारतातील १० राज्यांमध्ये प्रामुख्याने डेल्टा प्लसचे रुग्ण आढळत आहेत. त्यात महाराष्ट्रात आत्तापर्यंत सर्वाधिक २० रुग्ण आढळून आल्यामुळे चिंता वाढलेली असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने आता डेल्टा प्लसचा मूळ व्हेरिएंट असलेला डेल्टा व्हेरिएंट आजपर्यंत जगभरात सापडलेल्या विषाणूंमध्ये सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा विषाणू असल्याचे स्पष्ट केल्यामुळे लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या जगभरातील नागरिकांनी देखील मास्क घालणे आवश्यक असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.

शुक्रवारी जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO चे प्रमुख डॉ. टेड्रॉस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे गांभीर्य विषद केले. भारतात पहिल्यांदा आढळून आलेल्या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटचे जगातील जवळपास ८५ देशांमध्ये रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत सापडलेल्या कोरोना व्हेरिएंटमध्ये हा प्रकार सर्वाधिक वेगाने संक्रमण होणारा प्रकार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कोरोनासंदर्भातील नियमांचे आपण सगळ्यांनी काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे. त्याबरोबरच या विषाणूला थांबवायचे असेल तर जगातील सर्वच देशांमध्ये समान पद्धतीने लसींचा पुरवठा व्हायला हवा, असे टेड्रॉस यावेळी म्हणाले.

दरम्यान, कोरोनाच्या नवनवीन व्हेरिएंटला यावेळी डॉ. टेड्रॉस यांनी आवर घालण्याचे सूत्र दिले. या विषाणूचे संक्रमण जेवढे आपण कमी करू, तेवढे त्याचे व्हेरिएंट कमी असतील, असे ते म्हणाले. त्यासाठी व्यापक लसीकरणाची गरज त्यांनी व्यक्त केली. हे लसीकरण जगातील सर्वच देशांमध्ये व्हायला हवे, असे त्यांनी नमूद केले. यावेळी श्रीमंत देशांमध्ये होत असलेल्या गर्दीवर देखील त्यांनी नाराजी व्यक्त केली. या देशांमध्ये तुम्ही कुठेही गेला तरी तुम्हाला गर्दी दिसेल. जणूकाही साथ नाहीच आहे. मग ज्या देशांमध्ये तुम्ही लसींचा पुरवठा पुरेसा झालेला नाही अशा देशांमध्ये जा. तिथे तुम्हाला लॉकडाऊन दिसेल, असं टेड्रॉस यांनी सांगितले.