मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा! गुगल आणि जिओचा जगातील सर्वात स्वस्त फोन गणेश चतुर्थीला येणार


मुंबई – 44 व्या वार्षिक बैठकीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘जिओ फोन नेक्स्ट’ हा नवा फोन गुगल आणि जिओ टीमने विकसित केला आहे. ते म्हणाले की गूगल आणि जिओने संयुक्तपणे जिओ फोन नेक्स्ट तयार केला असून हा एक संपूर्ण फिचर स्मार्ट फोन आहे. भारत आणि जगभरातील सर्वात परवडणारा हा स्मार्टफोन असल्याचा दावा जिओकडून करण्यात आला आहे. हा फोन 10 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थीपासून बाजारात उपलब्ध होईल.

वापरकर्ते भारतीय बाजारपेठेसाठी खास तयार केलेल्या जिओफोन नेक्स्ट स्मार्टफोनवर गुगल प्लेवरून अ‍ॅप्स डाउनलोड करू शकतात. सर्वोत्कृष्ट कॅमेरा आणि अँड्रॉइड अपडेटसुद्धा या स्मार्टफोनला मिळतील. मुकेश अंबानी यांनी संपूर्णपणे फिचर स्मार्टफोनचे वर्णन केवळ भारतातच नव्हे तर जगातील सर्वात स्वस्त स्मार्टफोन म्हणून केले आहे.

रिलायन्स जिओने गेल्या वर्षी गुगलबरोबर भागीदारीची घोषणा केली होती. गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई नवीन स्मार्टफोनविषयी म्हणाले, आमचे पुढचे पाऊल गुगल आणि जिओच्या सहकार्याने नवीन, परवडणाऱ्या स्मार्टफोनपासून सुरू होत आहे. हा फोन भारतासाठी तयार करण्यात आला असून त्या लाखो नवीन वापरकर्त्यांसाठी आहे, जे पहिल्यांदाच इंटरनेटचा अनुभव घेतील. गूगल क्लाऊड आणि जिओ दरम्यान नवीन 5 जी भागीदारी अब्जाहून अधिक भारतीयांना वेगवान इंटरनेटला जोडण्याला मदत करेल. सोबत भारताला डिजिटल करण्याची ही पायाभरणी असेल.

जगातील सर्वात मोठा मोबाइल डेटा कॅरियर रिलायन्स जिओ बनल्याचे कंपनीने सांगितले आहे. केवळ मागील वर्षात डेटा खपातील ही 45% वाढ आहे. शिवाय, वापरकर्त्यांनी दरमहा 630 कोटी जीबी वापरला असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. मुकेश अंबानी यांनी 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM) खुलासा केला की, रिलायन्स जिओने या वर्षात 37.9 दशलक्ष नवीन ग्राहकांना जोडले आहे. कंपनी आता 425 दशलक्षाहूनही अधिक ग्राहकांना सेवा देत आहे. जिओ प्लॅटफॉर्मचा निव्वळ नफा 86,493 कोटी रुपये एवढा आहे.