नवी दिल्ली – एकीकडे देशावर ओढावलेली कोरोनाची दुसरी लाट सध्यातरी ओसरत असतानाच दुसरीकडे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत वेगवेगळे कयास लावले जात आहेत. तज्ज्ञांच्या मते, भारतात लवकरच कोरोनाची तिसरी लाट येऊ शकते. तसेच लहान मुलांवर या लाटेचा परिणाम होणार असल्याचा अंदाज तज्ञांनी वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर मुलांच्या लसीसंदर्भात मोठी माहिती समोर आली आहे.
AIIMS च्या प्रमुखांनी वर्तवली लहान मुलांच्या लसीला सप्टेंबरमध्ये मान्यता मिळण्याची शक्यता
सप्टेंबरपर्यंत भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसीला मान्यता मिळणार असल्याची शक्यता असल्याचे दिल्ली एम्स रूग्णालयाचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी सांगितले. डॉ. गुलेरिया म्हणाले, कोव्हॅक्सिनच्या फेज दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीनंतर सप्टेंबरपर्यंत डेटा उपलब्ध होईल. तसेच फायझर-बायोटेकला भारतात मान्यता मिळाल्यास ते मुलांच्या लसीला पर्याय ठरू शकते.
२ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांवर एम्स पटना आणि एम्स दिल्लीमध्ये कोव्हॅक्सिन लसीची चाचणी चालू आहे. १२ मे रोजी डीसीजीआयने मुलांवर फेज II आणि III चाचणींसाठी भारत बायोटेकला मान्यता दिली होती. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुले सर्वात जास्त प्रभावित होतील, असे सांगितले जात आहे.
दरम्यान एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी कोरोनाच्या पुढील लाटेत लहान मुले संक्रमित होतील, अशी माहिती देणारा भारतात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणताही डेटा उपलब्ध नसल्याचे म्हटले आहे. कोरोना स्थितीसंबंधी माहिती देण्यासाठी आयोजित संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे लहान मुलांना अनेक गंभीर आजार होणार असल्याची माहिती चुकीची असल्याचे सांगितले होते. देशात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर असा कोणताही डेटा उपलब्ध नाही, ज्यामध्ये कोरोना लाटेत मुले गंभीर संक्रमित होणार असल्याचे सांगण्यात आले आहे, अशी माहिती रणदीप गुलेरिया यांनी यावेळी दिली.