कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर प्रतिबंधक लसींचा प्रभाव नाही; आरोग्य संघटनेचा दावा


नवी दिल्ली – सध्याच्या काळात जगभरात उपलब्ध असलेल्या कोरोना प्रतिबंधक लसींपैकी जवळपास सर्वच लसी या कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटवर परिणामकारक दिसत नाही. जागतिक आरोग्य संघटनेचे संसर्गजन्य रोगांच्या जाणकारांनी यासंदर्भातील माहिती सांगितली आहे. कोरोनाचे नवीन पद्धतीचे व्हेरिएंटही भविष्यामध्ये पहायला मिळतील. या व्हेरिएंटवर लस प्रभावी ठरणार नसल्याची भीतीही व्यक्त करण्यात आली आहे. पण सध्या जगभरात कोरोनाविरुद्ध लढ्यात लसीकरणाला प्राधान्य दिले जात असून जास्तीत जास्त लोकांचे लसीकरण करण्याचे सर्वच देश प्रयत्न करत आहेत.

सध्या लसीकरणामुळे कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी आणि मृत्यूदर आटोक्यात आणण्यासाठी फायदा होत असला तरी सतत म्युटेड होत राहणाऱ्या कोरोनाच्या नव्या प्रकारांमुळे चिंतेत भर पडली आहे. या विषाणूमध्ये सतत होत राहणाऱ्या म्युटेशनमुळे खूप बदल झालेल्या विषाणूच्या प्रकारावर म्हणजेच कॉन्स्टीलेशन ऑफ म्युटेशन असणाऱ्या विषाणूवर लसीचा परिणाम होणार नसल्याचे मत मारिया व्हॅन केर्कोव्ही यांनी व्यक्त केले आहे. या विषाणूला भविष्यात म्युटेड होण्याची संधीच उपलब्ध होऊ न देण्यासंदर्भात संशोधन होणे गरजेचे असल्याचेही मारिया यांनी म्हटले आहे.

भारतामध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक परिणाम डेल्टा व्हेरिएंट किंवा बी.१.६१७.२ व्हेरिएटमुळेच दिसून आल्याचे मानले जात. आकडेवारीनुसार यूनायटेड किंग्डममध्ये सध्या तिसरी लाट आली असून हा डेल्टा व्हेरिएंटच त्यासाठी जबाबदार आहे. आता डेल्टा व्हेरिएंटमध्येही म्युटेशन होत असून त्याचे रुपांतर डेल्टा प्लस व्हेरिएंटमध्ये झाले आहे.

सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रादुर्भाव भारतामध्ये होऊ लागला आहे. कोरोनाच्या या उत्पपरिवर्तीत विषाणूचे म्हणजेच डेल्टा प्लसचे महाराष्ट्रामध्ये २१ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी यात रत्नागिरी जिल्ह्यात नऊ, जळगावात सात, मुंबईत दोन, ठाणे, पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णांचा समावेश आहे, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी स्पष्ट केले. केरळमध्येही डेल्टा व्हेरिएंटचे तीन रुग्ण आढळून आले आहेत.

इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच आयसीएमआरच्या वैज्ञानिकांनी यापूर्वी आपल्या संशोधनाच्या प्राथमिक अहवालांमध्ये भारतात देण्यात येणाऱ्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसी या डेल्ट व्हेरिएंटविरोधात खूप कमी प्रमाणात अ‍ॅण्टीबॉडी निर्माण करतात. मात्र डेल्ट व्हेरिएंट सोडल्यास या लसी इतर व्हेरिएंटवर प्रभावी असल्याचे सांगण्यात आले आहे.

नवीन डेल्टा व्हेरिएंट हा लसींविरोधात जास्त प्रतिरोध करत असल्याचे अनेक संशोधनांमध्ये दिसून आले आहे. लॅन्सेच मेडिकल जर्नलमध्ये जूनच्या सुरुवातीला प्रकाशित झालेल्या ब्रिटनमधील एका संशोधनामध्ये डेल्टा, अल्फा (ब्रिटनमधील व्हेरिएंट) आणि बीटा (पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला) व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्यांमधील अ‍ॅण्टीबॉडीज आणि लसीच्या माध्यमातून तयार झालेल्या अ‍ॅण्टीबॉडीज यासंदर्भात तुलनात्मक संशोधन करण्यात आले. या व्हेरिएंटवर लस किती प्रभावी आहे याचा अभ्यास करण्यात येत आहे. सध्या जगभरामध्ये डेल्टा व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे.