टीआरपी घोटाळा प्रकरणात अर्णब गोस्वामी विरोधात नऊ महिन्यांनंतर पोलिसांनी दाखल केले दुसरे आरोपपत्र


मुंबई – मुंबई पोलिसांनी मंगळवारी टेलिव्हिजन रेटिंग पॉईंट (टीआरपी) घोटाळ्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरुद्ध दुसरे आरोपपत्र दाखल केले आहे. याप्रकरणी तक्रार नोंदवल्यानंतर नऊ महिन्यांनी पोलिसांनी अर्णब गोस्वामींचे नाव आरोपपत्रात दाखल केले आहे.

१,८०० पानांचे पुरवणी आरोपपत्र पोलिसांनी न्यायालयात दाखल केले आहे, ज्यात गोस्वामी आणि एआरजी आऊटलर मीडिया यांच्यासह आणखी चार लोकांची नावे आहेत. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत १५ जणांना दोषी ठरवले होते. ज्यामध्ये जीन ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) इंडियाचे माजी सीईओ पार्थो दासगुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीच्या सीईओ विकास खानचंदानी यांचा समावेश आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने २४ मार्च रोजी गोस्वामी यांनी दाखल केलेल्या याचिकेनंतर अटकेपासून मर्यादित संरक्षण दिले होते. याचिकेमध्ये पोलीस, विशेषत: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्याविरूद्ध गंभीर स्वरुपाचे गैरवर्तन केल्याचा आरोप अर्णब गोस्वामीने केला होता.

रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि दासगुप्ता यांच्यातील ‘व्हॉट्सअ‍ॅप’ संवादातून त्यांचा ‘टीआरपी’ घोटाळा उघडकीस आला होता. पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅप चॅटच्या आधारे तपास सुरु केला होता. त्यानंतर दासगुप्ता यांना अटक झाली होती. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास बडतर्फ एपीआय सचिन वाजे यांनी केला होता. ब्रॉडकास्ट ऑडियंस रिसर्च कौन्सिल (बीएआरसी) कडून पैसे घेतल्याचा आरोप यावेळी करण्यात आला होता.

अर्नब गोस्वामीविरोधात न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात ठाम पुरावे असल्याचे गुन्हे शाखेचे मत आहे. या आरोपपत्रामध्ये व्हॉट्सअ‍ॅप चॅटचाही समावेश करण्यात आला आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये टीआरपी कथित घोटाळा उघडकीस आल्यानंतर रेटिंग एजन्सी बीएआरसीने हंसा रिसर्च ग्रुप (एचआरजी) मार्फत तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार काही टीव्ही चॅनेल्स टीआरपीचे क्रमांक वाढवत असल्याचा आरोप करण्यात आला होता.