शरद पवारांच्या दिल्लीत आयोजित बैठकीवरुन अतुल भातखळकरांनी साधला निशाणा


मुंबई – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची पहिली भेट झाल्यानंतरच पडद्याआड बरच काही शिजत असल्याची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची सोमवारी पुन्हा पवारांच्या निवासस्थानी भेट झाली. राष्ट्रीय स्तरावर बिगरभाजप महाआघाडीच्या पर्यायाची चाचपणी सुरू असल्याची माहिती या भेटीनंतर समोर आली. शरद पवार यांच्या निवासस्थानी याचसंदर्भात विरोधी पक्षनेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक दिल्लीत आयोजित करण्यात आली आहे. भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी या बैठकीवरून टोला लगावला आहे.

सोमवारी शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी पुन्हा भेट घेऊन चर्चा केली. याआधी प्रशांत किशोर यांनी ११ जून रोजी मुंबईतही पवारांशी तीन तास चर्चा केली होती. सोमवारी झालेल्या बैठकीनंतर आज शरद पवार यांच्या निवासस्थानी विरोधी पक्षांतील नेत्यांची बैठक होत असून, या सर्व घडमोडींवर भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी ट्वीट करून निशाणा साधला.

भारतीय राजकारणातील चाणक्य (स्वयंघोषित) आणि भावी पंतप्रधान (हेही स्वयंघोषितच) यांनी दिल्लीत बैठक घेतली. त्यात जावेद अख्तरही होते. ‘शोले’चा रिमेक करण्याचा विचार आहे म्हणे… त्यात अन्ग्रेजो के जमाने के जेलरच्या भूमिकेत संजयच हवा, असा हट्टच साहेबांनी धरल्याची चर्चा असल्याचा टोला अतुल भातखळकर यांनी शरद पवार आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.

ही बैठक माजी केंद्रीय मंत्री व मोदींचे विरोधक मानले जाणाऱ्या यशवंत सिन्हा यांच्या ‘राष्ट्र मंच’ या बिगरराजकीय संस्थेने आयोजित केली आहे. या बैठकीचे समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष, तृणमूल काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल, राष्ट्रवादी काँग्रेस, आम आदमी पक्ष आदी १५ विरोधी पक्षांच्या नेत्यांना निमंत्रण पाठवण्यात आले आहे. ही बैठक बिगरभाजप आघाडीच्या शक्यतेवर चर्चा करण्यासाठी होत असली तरी, काँग्रेसला वगळून भाजपविरोधी आघाडी तयार करण्याबाबत शरद पवार वा अन्य विरोधी पक्ष नेत्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.