संसदेत पोहचला नुसरत जहां यांच्या लग्नाचा वाद; लोकसभा अध्यक्षांकडे भाजप खासदाराने केली मोठी मागणी


नवी दिल्ली – गेल्या काही दिवसांपासून पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार नुसरत जहां यांचे नाव चर्चेत आहे. सुरूवातीला त्यांचे पती निखिल जैन यांच्यासोबत बिनसल्याची चर्चा सुरू होती. त्यानंतर आमचे लग्नच भारतीय कायद्याच्या चौकटीत अवैध असल्याचे सांगत नुसरत जहां यांनी गौप्यस्फोट केला होता. आता थेट संसदेत नुसरत जहां यांच्या लग्नाचा वाद पोहोचला आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार करत भाजपचे खासदार संघमित्रा मौर्य यांनी मोठी मागणी केली आहे.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भाजप खासदार संघमित्रा मौर्य यांनी एक पत्र लिहिले आहे. लग्नाच्या मुद्द्यावरून नुसरत जहां यांची खासदारकी रद्द करण्याची मागणी मौर्य यांनी केली आहे. नुसरत जहां यांची वर्तणूक मर्यादेचा भंग करणारी असून, त्यांनी लग्नाचा विषय आपल्या मतदारांपासून लपवून ठेवला. याचा संसदेच्या प्रतिष्ठेवरही धूळ उडाली आहे. संसदेच्या एथिक्स कमिटीकडे हे प्रकरण पाठवण्यात यावे. याची चौकशी करून नुसरत जहां यांच्यावर कारवाई केली जावी, अशी मागणी खासदार मौर्य यांनी म्हटले आहे.

नुसरत जहां यांच्या लग्नाबद्दलही काही बाबी भाजपा खासदार संघमित्रा मौर्य यांनी पत्रातून मांडल्या आहेत. नुसरत जहां लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्या दिवशी सभागृहात नवरीप्रमाणे तयार होऊन आल्या होत्या. त्याचबरोबर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या सुद्धा नुसरत जहां यांच्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये सहभागी झाल्या होत्या, असा उल्लेखही मौर्य यांनी केला आहे.

दरम्यान काही दिवसांपूर्वी या प्रकरणावर नुसरत जहाँ यांनी खुलासा केला होता. त्यांनी ७ मुद्द्यांच्या माध्यमातून निवेदनच काढले होते. त्यामध्ये त्यांनी निखिल जैनसोबत झालेला विवाह हा भारतीय कायद्याच्या दृष्टीने अवैध असल्याचा खुलासा केला होता. तसेच, हा विवाह तुर्की कायद्यानुसार करण्यात आला होता, त्यामुळे तो भारतीय कायद्यानुसार अवैध असल्याचे देखील त्या म्हणाल्या होत्या.