उत्तर प्रदेशात धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश; दोघांना अटक


लखनौ – उत्तर प्रदेश पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम या दोघांना एटीएसने सोमवारी अटक केली. राष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या या धर्मांतर रॅकेटचा ते भाग असल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले आहे. दक्षिण दिल्लीतील जामिया नगर भागात मुफ्ती काझी जहांगीर कासमी आणि मोहम्मद उमर गौतम हे दोघे राहतात. त्यांचा धर्मांतर रॅकेटमध्ये सहभाग असून, मूकबधिर मुले आणि महिलांचे धर्मांतर केल्यांच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग असून त्यांनी आजवर १ हजारांपेक्षा जास्त लोकांचे धर्मांतर केल्याचे उत्तर प्रदेश पोलिसांनी म्हटले आहे.

त्याचबरोबर या दोघांनी नोएडातील मूकबधिर शाळेतील मुलांचेही धर्मांतर केल्याची माहिती पोलिसांनी दिली. गोमतीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणी राज्यात लागू करण्यात आलेल्या धर्मांतर विरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात इस्लामिक दवाह केंद्राचे अध्यक्षांचाही एफआयआरमध्ये उल्लेख करण्यात आला आहे.

याबाबत माहिती देतान उत्तर प्रदेशचे अतिरिक्त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) प्रशांत कुमार म्हणाले की, प्रदेशातून या रॅकेटला पैसा पुरवला जात असल्याचे पुरावे पोलिसांकडे होते. दोघांनाही चौकशी करण्यात आल्यानंतर अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी आम्हाला महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. यात परदेशातून पुरवल्या जाणाऱ्या पैशांसंदर्भातील कागदपत्रांचाही समावेश असल्याचे कुमार यांनी सांगितले.

दोघांची पोलिसांनी चौकशी केली. त्यांनी यावेळी वर्षभरात २५० ते ३०० मुलांचं धर्मांतर केल्याची माहिती दिली. लोकांना पैसे आणि नोकरीचे आमिष देऊन हे धर्मांतर करत होते. कल्याणपूर आणि कानपूर येथील दाम्पत्यांच्या मूकबधिर मुलाचे धर्मांतर करण्यात आले. त्यानंतर त्यांना दक्षिण भारतात पाठण्यात आले. अशी हजारो प्रकरण समोर आल्याचे प्रशांत कुमार म्हणाले.