बहुमूल्य मोती, जाणून घेऊ या काही तथ्ये


हिरा हा सर्व रत्नांचा राजा असेल, तर मोत्याला सर्व रत्नांची राणी समजले जाते. किंबहुना राणी एलिझाबेथ पासून जयपूरच्या महाराणी गायत्रीदेवी, आणि अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती जॉन एफ केनेडी यांच्या पत्नी जॅकलीन यांच्यासहित अनेक नामवंत महिलांनी नेहमीच मोत्यांच्या आभूषणांना पसंती दिली आहे. नैसर्गिक रित्या तयार होत असणारे मोती हे शिंपल्यांमधून तयार होत असतात. एका शिंपल्यामध्ये मध्यम आकाराचा मोती तयार होण्यास सुमारे पाच वर्षांचा कालावधी लागतो. चंद्रराशीप्रमाणे ज्यांचा जन्मदिन जून महिन्यामध्ये असतो, त्यांच्यासाठी मोती हे रत्न शुभफल देणारे समजले जाते.

प्राचीन ग्रीक परंपरेच्या अनुसार नववधूने गळ्यामध्ये मोत्याची आभूषणे घालणे हे पावित्र्याचे आणि सौंदर्याचे प्रतीक समजले जाते. ही परंपरा फार प्राचीन काळापासून अस्तित्वात असून, आजही पाश्चात्य देशांमध्ये विवाहसोहोळ्याच्या वेळी नववधू मोत्याची आभूषणे आवर्जून परिधान करीत असतात. ग्रीक परंपरेच्या अनुसार देवतांच्या अश्रुंमधून मोत्याची निर्मिर्ती झाली असून, नववधू आपल्या विवाहप्रसंगी दुःखी-कष्टी होऊ नयेत या साठी त्यांनी मोत्यांची आभूषणे घालावीत अशी परंपरा आहे.

अलीकडच्या काळामध्ये पहावयास मिळणाऱ्या मोत्यांच्या आभूषणांपैकी सुमारे नव्वद टक्के मोती हे ‘कल्चर्ड’, म्हणजेच कृत्रिम रित्या तयार केलेले असतात. जगातील सर्वात मौल्यवान आणि टपोरा समजला जाणारा ‘ला पेरेग्रीना’ नामक मोती असून, याच्या नावाचा अर्थ ‘कोणाशीही तुलना न केली जाऊ शकणारा’, असा आहे. असा हा अतुल्य मोती ‘पेअर’ या फळाच्या आकाराचा असून, एके काळी इंग्लंडची राणी मेरी ट्युडर आणि त्यानंतर जगज्जेता नेपोलियन यांच्या मालकीचा होता. अलीकडच्या काळामध्ये हा मोती सुप्रसिद्ध हॉलीवूड अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांच्या संग्रही होता.

जगामध्ये कोणतेही दोन नैसर्गिक मोती एकसारखे असत नाहीत. तसेच कोणताही मोती ‘परफेक्ट’ असत नाही. प्रत्येक मोत्यामध्ये काही ना काही उणीव आढळून येतेच. किंबहुना मोती अस्सल आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी मोती दातांवर घासून पाहण्याची पद्धत आहे. असल मोती एकदम नितळ नसून काहीसा खडबडीत असतो. मोती हे रत्न राजघराण्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाणारे होते. मोती हे केवळ आभूषणांसाठी वापरले जात नसून, सिंहासनावरील आच्छादने, तलवारी, शिरपेच, आणि पोशाखांवरही मोत्यांची कलाकुसर केली जात असे. किंबहुना राणी एलिझाबेथ (पहिली) हिच्या संग्रही मौल्यवान मोत्यांची कलाकुसर केलेले तब्बल तीन हजार पोशाख असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment