जगभरामध्ये सर्वात जास्त वापरला जाणारा आहे हा ‘पासवर्ड’


आजकालच्या डिजिटल दुनियेमध्ये, जगभरातील कोट्यवधी लोक, स्वतःशी निगडीत अत्यंत खासगी स्वरूपाची माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड्सचा वापर करीत असतात. हे पासवर्ड्स ठाऊक असलेल्या व्यक्तीलाच केवळ अत्यंत खासगी स्वरूपाची माहिती उपलब्ध होऊ शकते. लोक शक्यतो पासवर्ड म्हणून आपली जन्मतारीख, किंवा लग्नाच्या वाढदिवसाची तारीख, किंवा तत्सम महत्वाच्या तारखा, आपल्या जोडीदारांची, अपत्यांची नावे इत्यादींचा वापर करून आपले पासवर्ड्स निवडत असले, तरी एक पासवर्ड असा आहे, ज्याचा वापर जगामध्ये सर्वाधिक प्रमाणात केला जातो.

‘123456’ हा तो पासवर्ड असून, एका सायबर सिक्युरिटी संबंधित संशोधनामध्ये हा पासवर्ड जगामध्ये सर्वाधिक वापरला जात असल्याचे म्हटले आहे. बीबीसीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या रिपोर्टअनुसार ब्रिटनच्या राष्ट्रीय सायबर सिक्युरिटी सेंटरद्वारे हे संशोधन केले गेले असून, त्याद्वारे सायबर जगतातील काही त्रुटी उघड झाल्या आहेत, ज्यांमुळे नेटीझन मंडळी अडचणीत येऊ शकतात. या संशोधनाच्या अंतर्गत सार्वजनिक डेटाबेस अकाऊन्ट्सचे विश्लेषण केले गेले असून, नेटकरी स्वतःची खासगी माहिती सुरक्षित ठेवण्याकरिता कशा प्रकारचे पासवर्ड्स वापरत असावेत याचे अध्ययन केले गेले. त्यावेळी ‘123456’ हा पासवर्ड सर्वाधिक नेटकऱ्यांनी वापरला असल्याचे निदान या संशोधनाद्वारे करण्यात आले. त्या पाठोपाठ ‘123456789’ हा पासवर्डही सर्वाधिक वेळेला वापरला गेला असल्याचे संशोधनकर्त्यांनी म्हटले आहे.

अनेक अक्षरे, आकडे यांचे मिश्रण करून अवघड पासवर्ड तयार करण्यापेक्षा ‘123456’ आणि तत्सम पासवर्ड नेटीझन्सच्या सहज लक्षात राहत असले, तरी या पासवर्ड्सचा वापर करून हॅकर्सदेखील एखाद्याबद्दल व्यक्तिगत माहिती सहज मिळवू शकत असल्याचा धोकाही यामध्ये हटकून असतोच. ‘१२३४५६’ सोबत ‘QWERTY’, ‘1111111’ आणि ‘पासवर्ड’ हे ही पासवर्ड्स मोठ्या प्रमाणात वापरले जात असल्याचे संशोधनकर्त्यांनी म्हटले आहे. मोठ्या प्रमाणात पासवर्ड म्हणून वापरल्या जाणाऱ्या नावांमध्ये ‘अॅश्ले’, ‘मायकल’, ‘डेनियर’, ‘जेसिका’, चार्ली’ इत्यादी नावे सर्वसाधारणपणे वापरली आत असल्याचेही संशोधनकर्त्यांनी म्हटले आहे. पासवर्ड म्हणून ‘लिव्हरपूल’ आणि चेल्सी’ या फुटबॉल प्रीमियर लीगच्या टीम्सची नावे ही लोकप्रिय असल्याचे या संशोधनामध्ये म्हटले आहे.

Leave a Comment