मुंबई – भाजपने ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक बेपत्ता असून त्यांना शोधून काढा अशी तक्रार केली आहे. ही तक्रार भाजप प्रवक्ते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांनी केली असून यावेळी आंदोलनदेखील करण्यात आले. दरम्यान यावेळी पोलीस ठाण्याबाहेर ‘आमदार झाले मिस्टर इंडिया’ अशी पोस्टरबाजी करत आमदारांना शोधून द्या अशा घोषणा देण्यात आल्या. किरीट सोमय्या यांनी यावेळी प्रताप सरनाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीत लपवल्याचा गंभीर आरोप केला आहे.
किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप; प्रताप सरनाईकांना उद्धव ठाकरेंनी मातोश्रीत लपवले
ठाण्यातील वर्तकनगर येथे किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांनी पदाधिकाऱ्यांसोबत साखळी आंदोलन केले. यावेळी माजिवडा मतदार क्षेत्रातील आमदार प्रताप सरनाईक हे गेले अनेक दिवस अज्ञातवासात आहेत. ते हरवल्याची तक्रार करण्यासाठी किरीट सोमय्या आणि निरंजन डावखरे आले होते.
प्रताप सरनाईक मागील १०० दिवसांपासून गायब आहेत. आम्हाला कोणीतरी ते मातोश्रीत जाऊन लपले असल्याचे सागितले आहे. म्हणून आम्ही वर्तकनगर पोलीस ठाण्यात आमदार गायब झाल्याची तक्रार देण्यासाठी आलो आहेत. प्रताप सरनाईक मातोश्रीवर आहेत का याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी यावेळी केली.
या मतदारसंघात कोविड काळात हजारो लोक कोरोनाबाधित झाले असून याकाळात आमदारांचा थांगपत्ताच नाही. मग आमदार कशासाठी आहेत? उद्धव ठाकरेंच्या मातोश्रीत लपण्यासाठी का, असा टोलाही यावेळी त्यांनी लगावला. अशा घोटाळेबाज आमदाराला लपवण्याचे काम करत आहेत, याबद्दल आम्हाला मुख्यमंत्र्यांनाही विचारायचे असल्याचे ते म्हणाले आहेत.