स्विस बँकांतील भारतीयांच्या एकूण निधीने मागील १३ वर्षांतील गाठला सर्वोच्च स्तर; अर्थ मंत्रालयाचे स्पष्टीकरण


नवी दिल्ली – २.५५ अब्ज स्विस फ्रँक अर्थात सुमारे २०,७०० कोटी रुपयांपेक्षा भारतीय व्यक्ती आणि कंपन्यांचा स्विस बँकांमध्ये थेट तसेच भारतातील शाखा व अन्य वित्तीय संस्थांच्या माध्यमातून गुंतलेला निधी २०२० अखेरपर्यंत जास्त झाला आहे. स्वित्झर्लंडच्या मध्यवर्ती बँकेकडून गुरुवारी जाहीर झालेल्या वार्षिक आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. हे वृत्त त्यानंतर माध्यमांमधून समोर आले होते. पण हे वृत्त अर्थमंत्रालयाने नाकारले आहे. स्विस बँकांमधील ठेवींमधील वाढ किंवा घट याची पडताळणी करण्यासाठी स्विस अधिकाऱ्यांकडून मंत्रालयाने माहिती मागवली आहे.


याबाबत मंत्रालयाने शनिवारी ट्विट स्विस अधिकाऱ्यांकडून माहिती मागवली असल्याची माहिती दिली. प्रसिध्दीपत्रक जारी करत मंत्रालयाने म्हटले आहे की, असे अनेक अहवाल शुक्रवारी प्रसारमाध्यमामध्ये प्रसिद्ध करण्यात आले होते, ज्यात असे म्हटले आहे की सन २०२० अखेर स्विस बँकांमध्ये जमा झालेल्या भारतीयांचे पैसे २०,७०० कोटी रुपयांवर गेले आहेत. २०१६ साली ही रक्क्म ६,६२५ कोटी होती. दोन वर्षांपासून घसरण होत असताना यावेळी स्विस बँकांमध्ये जमा झालेल्या भारतीयांच्या पैशात वाढ झाल्याचे मीडिया रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे. गेल्या १३ वर्षातील ठेवींमधील ही सर्वात मोठी आकडेवारी असल्याचेही मीडियाच्या वृत्तात म्हटले होते.


माध्यमांच्या रिपोर्ट्सच्या वृत्तांमधून असे कळते की, बॅंकांनी स्विस नॅशनल बँकेकडे (एसएनबी) नोंदविलेले अधिकृत आकडेवारी आहे आणि स्वित्झर्लंडमध्ये भारतीयांनी ठेवलेली ही रक्कम काळा पैसा असल्याचे दर्शवत नाही. त्याचबरोबर या आकडेवारीत अनिवासी भारतीय किंवा अन्य लोकांद्वारे तिसऱ्या देशातील संस्थांच्या नावावर स्विस बँकांमध्ये पैसे असू शकतात, असे मंत्रालयाने म्हटले आहे.


ग्राहकांनी २०१९ अखेरपासून जमा केलेली रक्कम कमी झाली आहे. सन २०१९च्या अखेरीस विश्वासदर्शक संस्थांमार्फत असणारा निधीही निम्म्याहून अधिक खाली आला आहे. सर्वात मोठी वाढ ही बाँड्स, सिक्युरिटीज आणि इतर अनेक वित्तीय साधनांच्या रूपात असल्याचे मंत्रालयाने सांगितले. कर प्रकरणी भारत आणि स्वित्झर्लंड यांनी परस्पर प्रशासकीय सहाय्यच्या (मॅक) बहुपक्षीय अधिवेशनावर स्वाक्षरी केली आहे. दोन्ही देशांनी बहुपक्षीय सक्षम प्राधिकरण करारावर (एमसीएए) स्वाक्षरी केली आहे. त्यानुसार, २०१८ नंतर वार्षिक खात्यातील माहिती सामायिक करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये ऑटोमॅटिक एक्सचेंज ऑफ इन्फॉरमेशन (एईओआय) कार्यान्वित केले गेल्याचे मंत्रालयाने प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे.

२०१२ मध्ये तसेच २०२० मध्ये भारत आणि स्वित्झर्लंडमध्ये त्यांच्या नागरिकांच्या आर्थिक माहितीची देवाणघेवाण केली. वित्तीय खात्यांच्या माहितीच्या देवाणघेवाणीसाठी सध्याची कायदेशीर व्यवस्था पाहता भारतीय रहिवाशांच्या अघोषित उत्पन्नांपेक्षा स्विस बँकांमध्ये ठेवी वाढण्याची कोणतीही संभाव्य शक्यता दिसत नसल्याचेही मंत्रालयाने नमूद केले आहे.