चार सिंहांना झाली कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लागण


चेन्नई – चेन्नईमधील अण्णा प्राणीसंग्रहालयातील चार सिंहांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या जनुकीय संरचनेच्या नमुन्यांच्या चाचणीनंतर त्यांना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लागण झाल्याचे समोर आले आहे. या प्राणी संग्रहालयाच्या प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली.

११ सिंहांचे या प्राणी संग्रहालयाने नमुने कोरोना चाचणीसाठी पाठवले होते. त्यापैकी चार सिंहांचे नमुने २४ मे रोजी तर उरलेल्या सात सिंहांचे नमुने २९ मे रोजी पाठवले होते. त्यापैकी ९ सिंहांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. या सर्वांवर सध्या उपचार सुरु आहेत.

या प्राणी संग्रहालयाच्या व्यवस्थापकांकडून सांगण्यात आले आहे की, या सिंहांच्या जनुकीय संरचनेचा त्यांनी अहवाल मागवल्यानंतर वैद्यकीय संस्थांनी तो पाठवला. त्यामध्ये असे आढळून आले की चार सिंहांना कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटची लागण झाली आहे. या पूर्वी नऊ वर्षांची सिंहीण नीला आणि पथबंथन नावाचा १२ वर्षांचा सिंह या दोघांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

तर हैद्राबादमधील नेहरु प्राणीसंग्रहालयातील ८ सिंहांना गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. या सिंहांना विलगीकरणात ठेवण्यात आले होते. याविषयी द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार, या सिंहांना कोरडा खोकला, नाक वाहणे, खाण्यापिण्याच्या तक्रारी अशी लक्षणे दिसून आल्यानंतर त्यांची चाचणी करण्यात आली.

सिंहांना ही लक्षणे जाणवत असल्याचे प्राणी संग्रहालयाच्या केअरटेकर्सच्या २४ एप्रिलला लक्षात आले होते. यापूर्वी अन्य देशात प्राण्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येत होते. पण भारतात प्राण्यांना कोरोनाची लागण होण्याची ही पहिलीच घटना ठरली. या प्राणी संग्रहालयातील १२हून अधिक कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली होती.