सोशल मीडियामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांचा आत्महत्येचा प्रयत्न


नवी दिल्ली – सोशल मीडियामुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेले दिल्लीमधील ‘बाबा का ढाबा’चे मालक कांता प्रसाद यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. सफदरजंग रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना गुरुवारी रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. युट्यूबर गौरन वासव याने कांता प्रसाद यांचा व्हिडीओ शूट करत त्यांची परिस्थिती सांगित्यानंतर ते प्रसिद्धीच्या झोतात आले होते. यावरुन नंतर अनेक वाददेखील झाले होते.

या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८१ वर्षीय कांता प्रसाद गुरुवारी रात्री सव्वा ११ वाजण्याच्या सुमारास सफदरजंग रुग्णालयात दाखल असल्याची माहिती मिळाली. कांता प्रसाद यांनी मद्य तसेच झोपेच्या गोळ्या एकत्र घेतले होते. हीच माहिती त्यांच्या मुलानेही जबाबात दिली आहे. रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमध्ये ते बेशुद्ध असल्याचे म्हटले आहे.