मुंबई – महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरू लागल्याचे चित्र दिसत असून राज्यातील नवीन कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक कमी होत असल्यामुळे राज्य सरकारने एप्रिलमध्ये लागू केलेले निर्बंधही काही प्रमाणात शिथिल केले आहेत. तर काही जिल्ह्यांमध्ये निर्बंध पूर्णपणे हटवले आहेत.
मुंबईसह ‘या’ जिल्ह्यांतील निर्बंध होणार शिथिल?
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता कमी होताना दिसत असली, तरी दुसरीकडे तिसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली जात असल्यामुळे राज्यातील निर्बंध हटवण्यासंदर्भात आणि दुसऱ्या लाटेत निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थितीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने पंचस्तरीय पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे. यानुसार निर्बंध शिथिल करण्यासंदर्भात जिल्ह्यांचे पाच गटात वर्गीकरण केले जात असून, प्रत्येक आठवड्याला निकषानुसार यादी जाहीर केली जात आहे. पुढील आठवड्यातील निर्बंध शिथिल करण्यासंदर्भातील जिल्ह्यांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
निर्बंध हटवण्यासंदर्भात पाच गट राज्य सरकारने तयार केलेले आहेत. या जिल्ह्यांचे पॉझिटिव्हीटी रेट आणि उपलब्ध ऑक्सिजन बेडची संख्या यानुसार वर्गीकरण केले जाते. सरकारने काढलेल्या आदेशाप्रमाणे सर्वात कमी पॉझिटिव्हीटी रेट म्हणजेच ५ टक्क्यांच्या आत पॉझिटिव्हीटी रेट असणाऱ्या जिल्ह्यांतील निर्बंध पूर्णपणे हटवण्यास परवानगी आहे. तर सर्वात जास्त पॉझिटिव्हीटी रेट असणाऱ्या जिल्ह्यातील निर्बंध वाढवण्याचे निर्देश दिलेले आहेत.
निर्बंध हटवण्यासंदर्भातील पंचस्तरीय कार्यपद्धती लागू करून दोन आठवडे झाले आहेत. राज्य सरकारने नुकतीच पुढील आठवड्यातील निर्बंध हटवण्यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. यात राज्यातील सर्वच जिल्ह्यांचा पॉझिटिव्हीटी रेट जाहीर करण्यात आल्यामुळे आतापर्यंत पाच टक्क्यांच्या वर पॉझिटिव्हीटी रेट असलेल्या पण आता पाच टक्क्यांच्या आत पॉझिटिव्हीटी रेट आलेल्या जिल्ह्यांतील नागरिकांना मोठा दिलासा मिळू शकतो.
पहिल्या गटातील जिल्हे (कंसात पॉझिटिव्हिटी रेट टक्क्यांमध्ये)
- अहमदनगर (३.०६)
- अकोला (४.९७)
- अमरावती (१.९७)
- औरंगाबाद (२.९४)
- भंडारा (०.९६)
- बुलडाणा (२.९८)
- चंद्रपूर (०.६२)
- धुळे (२.४२)
- गडचिरोली (३.५३)
- गोंदिया (०.२७)
- हिंगोली (१.९३)
- जळगाव (०.९५)
- जालना (१.५१)
- लातूर (२.५५)
- मुंबई (३.७९)
- नागपूर (१.२५)
- नांदेड (१.९४)
- नंदूरबार (३.१३)
- नाशिक (४.३९)
- परभणी (०.९४)
- सोलापूर (३.७३)
- ठाणे (४.६९)
- वर्धा (१.१२)
- वाशिम (२.७९)
- यवतमाळ (३.७९)
पहिल्या गटात नसणारे जिल्हे (कंसात पॉझिटिव्ही रेट टक्क्यांमध्ये)
- बीड (७.११)
- कोल्हापूर (१३.७७)
- उस्मानाबाद (५.२१)
- पालघर (५.१८)
- पुणे (९.८८)
- रायगड (१२.७७)
- रत्नागिरी (११.९०)
- सांगली (८.१०)
- सातारा (८.९१)
- सिंधुदुर्ग (९.०६)
पहिल्या गटात काय सुरू होणार?
- पहिल्या गटात येणाऱ्या शहरांतील आणि जिल्ह्यांतील सर्व प्रकारची दुकाने पूर्ववत सुरू होणार.
- मॉल्स, थिएटर्स, मल्टिप्लेक्स, नाट्यगृहेसुद्धा नियमितपणे सुरू होणार.
- रेस्तराँ सुरू करण्यासाठीही परवानगी.
- लोकल सेवा पूर्ववत होईल मात्र, स्थितीनुसार स्थानिक आपत्ती व्यवस्थापन विभागास निर्बंध घालण्याची मुभा असेल.
- सार्वजनिक ठिकाणे, मैदाने खुली राहतील. वॉकिंग आणि सायकलिंगला परवानगी असेल.
- सर्व खासगी कार्यालये उघडण्याची मुभा.
- शासकीय कार्यालयेही १०० टक्के कर्मचारी क्षमतेने सुरू राहतील.
- विविध खेळ, चित्रीकरण, सामाजिक, सांस्कृतिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांनाही मुभा असेल.
- लग्न सोहळा, अंत्यविधी, बैठका, निवडणूक यावर कोणतेही बंधने नसतील.
- जीम, सलून, ब्युटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर्सना परवानगी असणार आहे.
- सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्ववत करण्यात आली आहे.
- या भागात जमावबंदीही नसणार आहे.