राम मंदिर ट्रस्टच्या जमीन खरेदीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना साक्षी महाराज यांचे आवाहन


नवी दिल्ली – मंदिरासाठी राम मंदिर संस्थानने खरेदी केलेल्या जागेच्या कथित घोटाळ्याप्रकरणी सध्या राजकारण सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यातच आता राम मंदिर ट्रस्टच्या जमीन खरेदीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना खासदार साक्षी महाराज यांनी आवाहन केले आहे. आरोप करणाऱ्यांनी पावती दाखवून देणगीची रक्कम परत घेऊन जावी, असे साक्षी महाराज म्हणाले. त्याचबरोबर आम आदमी पक्षाचे संजय सिंह आणि सपाचे माजी आमदार पवन पांडे यांच्यावर त्यांनी टीका केली.

साक्षी महाराज म्हणाले, कारसेवकांवर ज्या पक्षाच्या प्रमुखांनी गोळीबार केला होता. तेथे आज रामचे भव्य मंदिर बांधले जात असल्यामुळे अशा लोकांना हे पचत नाही. राम मंदिर ट्रस्टचे चंपत राय यांनी आपले संपूर्ण जीवन भगवान रामसाठी समर्पित केले आहे, असा दावा देखील त्यांनी केला आहे. म्हणून, अशा व्यक्तीवर आरोप करणे पूर्णपणे निराधार आहे. आपण जर देणग्यांबद्दल बोलत असला तर आपण हिशोब घेऊ शकता किंवा पावती दाखवून देणगी परत घेऊ शकता, असे आवाहनही साक्षी महाराज यांनी खासदार संजय सिंह आणि अखिलेश यादव यांना केले आहे.

साक्षी महाराज पुढे म्हणाले की, राम मंदिराचा तीव्र विरोध करणारे हे लोक आहेत. राम मंदिराच्या नावाने अयोध्येत वीट ठेवता येणार नाही, असे ते म्हणायचे. पण त्याच अयोध्येत आज भगवान श्रीराम यांचे भव्य आणि जगातील सर्वोत्कृष्ट मंदिर बांधले जाणार आहे.