‘आरआरआर’ चित्रपटासाठी आलियाने घेतले रेकॉर्डब्रेक मानधन ?


अभिनेत्री आलिया भट्ट बॉलिवूडची अतिशय क्यूट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. लवकरच एस एस राजमौली यांच्या ‘RRR’ या चित्रपटात ती महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. आलिया या चित्रपटाच्या माध्यमातून दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहे. पण आलियाने या चित्रपटासाठी घेतलेले मानधन इतर दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या तुलनेत जास्त असल्याचे म्हटले जाते. आलिया ‘RRR’ या चित्रपटात ‘सीता’ ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. तिचा चित्रपटातील लूक सोशल मीडियावर सध्या चर्चेत होता.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, आलियाने या चित्रपटासाठी ६ कोटी रुपये मानधन घेतल्याचे म्हटले जाते. टॉलिवूडमधील इतर अभिनेत्रींच्या तुलनेत हे मानधन जास्त असल्याचे म्हटले जात आहे. पण बॉलिवूडमधील आलियाचे चित्रपट पाहाता निर्मात्यांनी तिला तगडे मानधन देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले जाते.

‘आरआरआर’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला होता. टीझर पाहाता चित्रपटाची कथा स्वातंत्र्यपूर्व काळातील दाखवण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. तसेच चित्रपटाची कथा आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यातील अलुरी सिथारामराजु व कोमराम भीम या स्वातंत्र्यवीरांवर आधारित असून ज्युनिअर एनटीआर हा कोमराम भीम ही भूमिका साकारणार आहे.

‘आरआरआर’ चित्रपटात आलियासोबतच राम चरण, अजय देवगण, ओलिविया मॉरिस, ज्युनिअर एनटीआर हे कलाकारही स्क्रीन शेअर करणार आहेत. ८ जानेवारी २०२१ मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे चित्रपटाच्या रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली. तेलुगू, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत हा चित्रपट रिलीज होणार आहे.