मुंबई महानगरपालिकेचे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदीत कोट्यावधीचे नुकसान, विरोधी पक्षनेते रवी राजा यांचा आरोप


मुंबई : कोरोना रुग्णालये आणि कोरोना उपचार केंद्रांसाठी मुंबई महानगरपालिकेने 1200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला. महापालिका चिनी बनावटीच्या एका कॉन्सन्ट्रेटरसाठी 79 हजार खर्च करणार आहे. त्यापैकी 300 कॉन्सन्ट्रेटर महानगरपालिकेने उत्पादकाकडून न घेता पुरवठादाराकडून घेतल्यामुळे महानगरपालिकेचे 1 कोटी 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाढणाऱ्या बाधितांच्या संख्येचा विचार करुन महानगरपालिकेने प्रति मिनिट दहा लिटर क्षमतेचे 1200 कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. श्रद्धा डिस्ट्रिब्युटर या कंपनीची या खरेदीसाठी निवड करण्यात आली आहे. महानगरपालिका यासाठी कंत्राटदाराला 10 कोटी 42 लाख रुपये मोजणार आहे.

पहिल्या टप्प्यात वितरकाने 300 कॉन्सन्ट्रेटरचा पुरवठा महानगरपालिकेला केला आहे. जे कॉन्सन्ट्रेटर बाजारात 54 हजार रुपयांना मिळतात, तेच कॉन्सन्ट्रेटर पालिकेने 79 हजार रुपयांना विकत घेतले आहे. या व्यवहारात पालिकेचे 1 कोटी 20 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं रवी राजा म्हणाले. जर उत्पादन करणाऱ्या कंपन्यासोबत महानगरपालिकेने करार केला असता, तर कमी किमतीत ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळाले असते. तसेच पालिकेचे 1 कोटी 20 लाख रुपये वाचले असते, रवी राजा यांनी सांगितले.

दरम्यान, कमी दरात ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मिळत असल्याचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटलं आहे. त्यांचे म्हणणे योग्य असले तरी कोरोनाच्या दुसऱ्या लाटे दरम्यान ऑक्सिजनची कमतरता भासली होती. नागरिकांना आणि रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा देता याव्यात यासाठी कॉन्सन्ट्रेटरची खरेदी करण्यात आल्याची माहिती स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली.

कोरोना रुग्णालये आणि कोरोना उपचार केंद्रांसाठी तब्बल 1200 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर खरेदी करण्याचा मुंबई महानगरपालिकेने निर्णय घेतला आहे. चिनी बनावटीच्या एका कॉन्सन्ट्रेटरसाठी 79 हजार रुपये खर्च केले जाणार असून बाजारभावापेक्षा प्रत्येकी तब्बल 15 ते 20 हजार रुपये जास्त दराने ही खरेदी केली जात आहे. 1200 पैकी 300 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर पुरवठादाराने महापालिका प्रशासनाला दिले आहेत.