कोणत्याही लसी तयार करताना वापरले जाते प्राण्यांचे सिरम

करोना प्रतिबंधासाठी भारत बायोटेकने तयार केलेल्या पहिल्या स्वदेशी कोवॅक्सिन लसीमध्ये गाईच्या बछड्याच्या रक्तातील पातळ द्रव (सिरम) चा वापर केल्याच्या खुलाशानंतर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरणे हा राजकीय डावपेचाचा भाग असल्याचे मत वैद्यानिकांनी व्यक्त केले आहे.

या संदर्भात संशोधकांनी असा खुलासा केला आहे की जेव्हा एखाद्या विषाणू विरुद्ध लस तयार केली जाते तेव्हा प्राथमिक पातळीवर घोडे. रेडे, म्हशी अथवा अन्य प्राण्यांच्या सिरमचा वापर गेली कित्येक दशके सर्वच देशातून केला जात आहे. मेडिकल सायन्स मध्ये ही प्रथा फार जुनी आहे. त्यामुळे या क्षेत्रातील तज्ञ, देशात कोवॅक्सिन वरून सुरु झालेल्या वादाने हैराण झाले आहेत.

कसौली सेंट्रल रिसर्च इन्स्टिट्यूटचे माजी प्रमुख प्रो. राकेश सहगल या संदर्भात बोलताना म्हणाले, कोणतीही लस तयार करण्यासाठी अगोदर पेशी तयार कराव्या लागतात. त्याला सेल्स लाईन म्हटले जाते. या पेशी वाढविण्यासाठी सिरमची आवश्यकता असते आणि ते प्राण्यांमधून घेतले जाते. ज्या पेशींची न्युट्रिशनल व्हॅल्यु जास्त असेल अशा पेशी या साठी लागतात आणि प्राण्यांमध्ये त्या अधिक असतात.

पोलिओ, रेबीज सारख्या लसी तयार करताना सुद्धा प्राण्याच्या सिरमचा वापर केला गेला आहे. कारण यातूनच सुरक्षित लस तयार होते. अंतिम प्रक्रियेत म्हणजे जेव्हा लसीचे मोठे उत्पादन सुरु करण्याची वेळ येते तेव्हा त्यात कुठलेच सिरम शिल्लक राहत नाही. कारण सिरम शिल्लक राहिले तर लस तयारच होऊ शकत नाही. सिरमचा वापर करण्याअगोदर ते पाणी, रसायने वापरून स्वच्छ केले जाते आणि त्यानंतर तयार केलेल्या पेशीत विषाणू संक्रमित केला जातो. त्यावर तयार केलेल्या औषधाच्या चाचण्या केल्या जातात आणि लस तयार होते असेही त्यांनी सांगितले.