एनआयएने चौकशीसाठी एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना घेतले ताब्यात


मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) एन्काऊंटर स्पेशालिस्ट माजी पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा यांना ताब्यात घेतले असून त्यांना आजच अटक होण्याची शक्यता आहे. मुंबईतील अंधेरी परिसरातील त्यांच्या घरावर एनआयने छापे टाकले आहेत. कारवाईला सकाळी सहा वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. यादरम्यान प्रदीप शर्मा यांच्या घराबाहेर मोठा बंदोबस्त तैनात आहेत. येथे सीआरपीएफच्या आठ ते दहा कंपन्या तैनात आहेत. उद्योजक मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवास्थानाबाहेरील स्फोटके आणि मनसुख हिरेन प्रकरणात प्रदीप शर्मा एनआयएच्या रडारवर आहेत.

या प्रकरणात याआधी एप्रिल महिन्यात सलग दोन दिवस प्रदीप शर्मा यांची एनआयएकडून चौकशी झाली होती. परंतु आता थेट छापा टाकून एनआयएनने झाडाझडती सुरु केली आहे. स्फोटकांनी भरलेली कार आणि मनसुख हिरेन हत्येमध्ये त्यांचा सहभाग असल्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.

फेब्रुवारी महिन्यात उद्योगपती मुकेश अंबानींच्या निवासस्थानाबाहेर जिलेटिनच्या 20 कांड्या आणि धमकीचे पत्र ठेवलेली एक स्कॉर्पिओ गाडी बेवारसपणे सोडण्यात आली होती. त्यानंतर गाडीचे मालक मनसुख हिरेन यांचा मृतदेह सापडला. या प्रकरणात मुंबई पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना एनआयएकडून अटक करण्यात आली होती.

प्रदीप शर्मा हे सचिन वाझे यांच्या जवळचे समजले जातात. यानंतर प्रदीप शर्मा यांचीही एनआयएने एप्रिल महिन्यात चौकशी केली होती. ही चौकशी काही महिने थांबली होती. परंतु आज सकाळी एनआयएने त्यांच्या घरावर छापा टाकून त्यांची चौकशी केली.