या किल्ल्यातून शत्रूवर डागले गेले होते चांदीचे गोळे

भारतात प्राचीन काळापासून देशाला स्वातंत्र मिळेपर्यंत अनेक राजे राजवाडे राज्य करत होते. त्यासाठी अनेक राजांनी गड किल्ले बांधले आणि स्वतः तसेच प्रजेच्या सुरक्षेची काळजी घेतली. यातील काही लढाया इतिहासात अमर झाल्या. राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील चुरूचा किल्ला इतिहासात असाच सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. त्यामागचे कारण फारच वेगळे आहे.

१६९४ मध्ये ठाकूर कुशलसिंह यांनी हा किल्ला बांधला. आत्मरक्षण आणि रयतेला सुरक्षा देणे हाच उद्देश त्यामागे होता आणि अन्य अनेक किल्ल्यांप्रमाणेच त्याचा उपयोग होत होता. पण हा किल्ला प्रसिद्धीला आला तो १८१४ साली. त्यावेळी येथे कुशलसिंहचा वंशज ठाकूर शिवजीसिंह राज्य करत होता.

शिवजीसिंह याच्या पदरी २०० पायदळ सैनिक आणि २०० घोडदल होते. पण युद्ध परिस्थिती उद्भवली तर त्याचे सैन्य वाढत असे. म्हणजे जनताच राजासाठी लढाईत उतरत असे. अगदी आपली संपत्ती, पैसा, दागिने सुद्धा जनता राजाच्या तिजोरीत लढाई साठी त्याग करून जमा करत असे. बिकानेरचा राजा सुरजसिंह याने चुरू राज्यावर ऑगस्ट महिन्यात हल्ला चढविला आणि युद्ध सुरु झाले. पण मधेच चुरू राजाचा दारूगोळा संपला आणि राजा चिंतेत पडला.

तेव्हा राज्यातील रयतेने त्यांच्या मालकीचे चांदी सोने राज्याच्या रक्षणासाठी दिले. राजाने सैनिकांना चांदीचे गोळे बनवून ते तोफेतून शत्रूवर डागण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे चांदीचे गोळे शत्रूवर डागले गेले. शत्रू सैन्य हा हल्ला पाहून हैराण झाले आणि त्यांनी हार मान्य केली. मात्र चांदीचे गोळे तोफेतून डागले गेल्याने हे युद्ध इतिहासात अजरामर झाले.