संभाजीराजेंच्या मराठा क्रांती मूक आंदोलनात सहभागी होणार प्रकाश आंबेडकर


पुणे – छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली असून बुधवारपासून कोल्हापुरात मूक आंदोलनास सुरुवात होणार आहे. दरम्यान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात राजर्षी शाहू महाराजांच्या समाधीस्थळी होत असलेल्या ‘मराठा क्रांती मूक आंदोलनात’ सहभागी होणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीने ट्विट करुन दिली आहे.


छत्रपती शिवाजी महाराज आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे वंशज असलेल्या छत्रपती संभाजीराजेंनी मराठा आरक्षणासाठी जो लढा उभा केला आहे त्याला पाठिंबा देऊन सामाजिक एकोप्याचा संदेश देण्यासाठी प्रकाश आंबेडकर उद्या कोल्हापुरात जाणार आहेत.

दरम्यान संभाजीराजे यांनी काही दिवसांपूर्वीच प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणासाठी राज्यभर दौरा करताना अनेक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या होत्या. यामध्ये प्रकाश आंबेडकरांचाही समावेश होता. संभाजीराजेंनी २९ मे रोजी पुण्यात प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली होती. मला शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे. शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर एकत येऊ शकतात, तर मी आणि प्रकाश आंबेडकर का एकत्र येऊ शकत नाहीत? हा भेटीमागचा हेतू होता, असे यावेळी त्यांनी म्हटले होते.