लोकजनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरून चिराग पासवान यांची हकालपट्टी !


पटना – बिहारमधील सध्या लोकजनशक्ती पार्टीत जोरदार घडामोडी सुरू असल्याचे दिसत असून पक्षनेते चिराग पासवान यांच्याविरोधात पक्षाच्या सहापैकी पाच खासदारांनी बंड करून, त्यांचे काका पशूपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली असून, आता लोकजनशक्ती पार्टीच्या अध्यक्षपदावरूनही चिराग पासवान यांना हटववण्यात आले आहे. त्यामुळे या घडामोडी चिराग पासवानसाठी अतिशय धक्कादायक ठरत आहेत.

सूरजभान यांना चिराग पासवान यांच्या जागी कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्त करण्यात आलेले आहे. सूरजभान हे पक्षाच्या नव्या अध्यक्षाची निवड प्रक्रिया संपन्न करतील. राष्ट्रीय कार्यकारणीची पाच दिवसांच्या आत बैठक बोलावून नव्या अध्यक्षाची निवड केली जाणार आहे. या अगोदर चिराग पासवान यांना पक्षाच्या संसदीय नेतेपदावरून हटवण्यात आले होते.


लोकजनशक्ती पक्षाच्या (एलजीपी) बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड केलेले पशूपतीकुमार पारस हे पक्षनेते चिराग पासवान यांचे वडील आणि लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू आहेत. तर, या सर्व धक्कादायक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर चिराग पासवान यांनी ट्विट करून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. या ट्विटसोबत त्यांनी एक जुने पत्र देखील जोडलेले आहे.

वडिलांनी बनवलेला हा पक्ष आणि आपले कुटुंब एकत्र ठेवण्यासाठी मी प्रयत्न केले, पण अयशस्वी ठरलो. पक्ष आई समान आहे आणि आईला धोका नाही दिला पाहिजे. लोकशाहीत जनताच सर्वकाही आहे, पक्षावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांना मी धन्यवाद देतो. एक जुने पत्र सार्वजनिक करत असल्याचे चिराग यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

चिराग पासवान यांना लोक जनशक्ति पार्टीतील अंतर्गत कलहाचा फटका बसला आहे. लोक जनशक्ति पार्टीच्या पाच बंडखोर खासदारांची मागणी सभापतींनी स्वीकारली आहे. त्यामुळे चिराग पासवान यांचे लोकसभेतील संसदीय पक्षाचे नेतेपद गेले आहे. आपल्या वेगळा गट म्हणून मान्यता देण्यात यावी, अशी मागणी पाच खासदारांनी केली होती.