कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या १ लाख चाचणी अहवाल बनावट


नवी दिल्ली – देशावर कोरोना संकट ओढावलेले असताना याच दरम्यान उत्तराखंडमध्ये कुंभमेळा पार पडल्यामुळे टीका झाल्यानंतर यासंदर्भात अजून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. हरिद्धारमध्ये कुंभमेळ्यादरम्यान करण्यात आलेल्या चाचण्यांपैकी चार लाख चाचणी अहवाल बनावट असल्याचा संशय उत्तराखंड आरोग्य विभागाने व्यक्त केला होता. यानंतर करण्यात आलेल्या तपासात एकूण १ लाख चाचणी अहवाल बनावट असून खासगी एनज्सीच्या सहाय्याने तयार करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. यासंदर्भातील वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.

एका प्रकरणात तर ५० जणांचे रजिस्ट्रेशन एकाच फोन क्रमांकावरुन करण्यात आलेले असून ७०० चाचण्यांसाठी एकच अँटिजन टेस्ट किट वापरण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात पत्ते आणि नावे देखील काल्पनिक आहेत. हरिद्वारमधील घर क्रमांक ५ मधून ५३० नमुने घेण्यात आले आहेत. एकाच घऱात ५०० लोक राहणे शक्य तरी आहे का? काहीजणांनी तर मनाप्रमाणे पत्ते टाकले आहेत. घर क्रमांक ५६, अलिगड; घर क्रमांक ७६, मुंबई असे पत्ते लिहिले असल्याची माहिती तपासात सहभागी एका अधिकाऱ्याने दिली आहे.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, काही जणांनी खोटे फोन नंबरही दिले आहेत. कानपूर, मुंबई, अहमदाबाद आणि १८ इतर ठिकाणच्या लोकांनी एकच फोन क्रमांक दिला आहे. कुंभमेळ्यातील आरोग्य अधिकारी डॉक्टर अर्जून सिंह सेनगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन खासगी प्रयोगशाळांमधील नमुने एजन्सीने जमा करणे अपेक्षित होते. त्याचीही चौकशी सुरु आहे. दरम्यान आरोग्य सचिव अमित नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, सविस्तर तपास अहवाल हरिद्वारच्या जिल्हा दंडाधिकाऱ्यांना पाठवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी अनियमितता आढळली असून जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी १५ दिवसांनी सविस्तर अहवाल पाठवल्यानंतर आम्ही कारवाई करु.

या प्रकरणाची पूर्ण चौकशी केली जात असून पुढील नोटीस येईपर्यंत, सर्व एजन्सींचे देय थांबण्यात आल्याचे हरिद्वारचे जिल्हा दंडाधिकारी सी रवीशंकर यांनी सांगितले आहे. धक्कादायक म्हणजे एजन्सीकडून नमुने गोळा करण्यासाठी जबाबदारी देण्यात आलेले २०० जण राजस्थानमधील विद्यार्थी आणि डेटा ऑपरेटर असल्याचे समोर आले आहे, जे कधीही हरिद्वारमध्ये आले नव्हते. नमुने गोळा करणारी व्यक्ती तिथे स्वत: उपस्थित असणे गरजेचे आहे. एजन्सीकडे नोंदणी असणाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यातील ५० टक्के राजस्थानचे रहिवासी असून विद्यार्थी आणि डेटा ऑपरेटर असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली आहे.

उत्तराखंडला कुंभदरम्यान दिवसाला ५० हजार चाचण्या करण्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर राज्य सरकारने एकूण आठ एजन्सींना नमुने गोळा करण्याची जबाबदारी दिली होती. हरिद्वारमध्ये १ ते ३० एप्रिलदरम्यान कुंभमेळा पार पडला. यावेळी नऊ एजन्सी आणि २२ खासगी प्रयोगशाळांनी मिळून एकूण चार लाख चाचण्या केल्या. यामध्ये अँटिजन टेस्ट सर्वाधिक होत्या. याशिवाय राज्य सरकारच्या वतीनेही सरकारी प्रयोगशाळेत चाचण्या करण्यात आल्या.

सध्या एजन्सीकडून करण्यात आलेल्या एक लाख चाचण्या वादात आहेत. यापैकी फक्त १७७ रिपोर्ट पॉझिटिव्ह होते, ज्यामुळे पॉझिटिव्हिटी रेट ०.१८ टक्के होता. याउलट एप्रिल महिन्यात हरिद्वारमधील पॉझिटिव्हीटी रेट १० टक्क्यांवर पोहोचला होता. पंजाबमधील एका व्यक्तीला जे कुंभमेळ्यात गेलेच नव्हते त्यांना हरिद्वार आरोग्य विभागाकडून कोरोनाचा निगेटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर हा घोटाळा उघडकीस आला. या व्यक्तीने आयसीएमआरकडे तक्रार केली. यानंतर त्यांनी राज्य प्रशासनाला याची माहिती दिली. एनज्सीला प्रत्येक अँटिजन टेस्टसाठी ३५० रुपये आणि आरटीपीसीआर टेस्टसाठी त्यापेक्षा जास्त पैसे दिले जात होते. याचा अर्थ हा करोडोंचा घोटाळा आहे. इतर एनज्सींकडून करण्यात आलेल्या चाचण्यांच्या अहवालाचीही तपासणी केली जात असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे.