रावसाहेब दानवेंच्या जनसंपर्क कार्यालयाची झाडाझडती घेतल्याप्रकरणी दोन फौजदारांसह पाच पोलीस निलंबित


जालना : केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जालन्यातील जाफराबाद येथील जनसंपर्क कार्यालयाची कोणत्याही कायदेशीर परवानगीशिवाय झाडाझडती घेतल्याप्रकरणी दोन फौजदारांसह पाच पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी ही कारवाई रावसाहेब दानवे यांच्या तक्रारीवरुन केली.

निलंबित पोलीस कर्मचाऱ्यांची पोलीस उपनिरीक्षक नितीन खुशालसिंग काकरवाल, पोलीस उपनिरीक्षक युवराज सुभाष पोठरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल मंगलसिंग रायसिंग सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल सचिन उत्तमराव तिडके आणि पोलीस कॉन्स्टेबल शाबान जलाल तडवी अशी नावे आहेत.

संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांनी 11 जून रोजी कोणती कायदेशीर परवानगी न घेता जालन्यातील जाफराबाद येथील केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या जनसंपर्क कार्यालयाची तपासणी केल्याचा आरोप आहे. या पोलीस कर्मचाऱ्यांनी यावेळी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत धक्काबुक्की केली. तसेच कामकाजाच्या संचिका देखील सोबत नेल्या, अशी तक्रार रावसाहेब दानवे यांनी केली होती. जालना जिल्हा पोलीस अधीक्षक विनायक देशमुख यांनी या प्रकरणी चौकशी करुन दोन पोलीस उपनिरीक्षकांसह पाच जणांचं निलंबन केले आहे.

दरम्यान रावसाहेब दानवे यांनी ही तपासणी करुन नेमके काय निष्पन्न झाले याचा खुलासा मागितला होता. या प्रकरणी चौकशी करुन पोलिसांचे वर्तन बेकायदेशीर आणि बेशिस्तपणाचे असल्याचा ठपका ठेवत जिल्हा पोलीस अधीक्षकांनी सोमवारी (14 जून) ही कारवाई केली.