मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन, निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी तब्बल तीन तास चर्चा केली. राजकीय वर्तुळात या भेटीनंतर विविध तर्क वितर्कांना उधाण आलेले आहेत. तर, शरद पवार यांची देशात भाजपच्या विरोधात सशक्त पर्याय उभा करण्याची योजना असून, राष्ट्रवादीचे त्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून अगोदरच स्पष्ट करण्यात आल्यामुळे आता या भेटीनंतर सुरू झालेल्या नव्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत शरद पवारांना सल्ला दिल्याचे दिसून आले आहे.
रामदास आठवलेंचा पवारांना खास सल्ला; कुणीही प्रशांत किशोरच्या नादी लागू नका
प्रशांत किशोरच्या कुणीही लागू नका नादी, कारण २०२४ मध्ये पंतप्रधान बनणार आहेत नरेंद्र मोदी. ते तर आहेत आंबेडकरवादी, मग का बनणार नाहीत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, असे रामदास आठवले यांनी आपल्या खास शैलीत सांगितले आहे.
प्रशांत किशोर के मत बनो आदी,
नरेंद्र मोदी हैं पक्के अम्बेडकरवादी।
2024 में फिर से पीएम बनेंगे मोदी !— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 13, 2021
तसेच, शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची भेट झाली, ही चांगली गोष्ट आहे. आम्हाला शरद पवार यांच्याबद्दल आदर आहे. परंतु पण सगळे विरोधी पक्ष भाजपच्या विरोधात एकत्र येणे अशक्य आहे आणि जरी एकत्र आले तरी देखील २०२४ च्या निवडणुकीत या देशाची जनता नरेंद्र मोदी यांनाच मतदान करणार आहे. त्यानांच पुन्हा एकदा सत्तेवर आणण्याचा प्रयत्न या देशातील जनता करणार असल्याचे देखील रामदास आठवले म्हणाले आहेत.
त्याचबरोबर प्रशांत किशोर २०१९ च्या निवडणुकीत आमच्यासोबत नव्हते, भाजपसोबत नव्हते. तरी देखील भाजपने जवळजवळ ३०३ जागा स्वतःच्या बळावर निवडून आणल्या आणि या देशात दुसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आता प्रशांत किशोर यांनी तर ममता बॅनर्जींच्या विजयानंतर पश्चिम बंगालनंतर, मी आता अशाप्रकारच्या राजकारणात राहणार नाही, अशा पद्धतीची भूमिका मांडली होती आणि शरद पवारांसोबतची माझी भेट व्यक्तिगत होती, असेही त्याचे म्हणणे आहे.
— Dr.Ramdas Athawale (@RamdasAthawale) June 13, 2021
त्यामुळे ठीक आहे. त्यांना जर विरोधी पक्षांची आघाडी करायची असेल तर त्यांना तो अधिकार आहे. परंतु किती जरी आघाडी केली, तरी देखील या देशातील जी परिस्थिती आहे. मागील सात वर्षांमध्ये नरेंद्र मोदींनी जी काही कामे केली आहेत व पुढील तीन वर्ष देखील ते अत्यंत चांगली कामे करणार असल्यामुळे या देशात काँग्रेसलाच ४०-४२ च्या पुढे जाता येत नाही, तर दुसऱ्या पक्षांना ते कसे शक्य होईल?. असं देखील रामदास आठवलेंनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओत म्हटले आहे.