एटीएम मशीन्सबद्दल जाणून घेऊ या ही महत्वपूर्ण माहिती


एटीएम मशीन्स अस्तित्वात आल्यापासून आपले आयुष्य खरेच खूप सोपे झाले आहे. आता जेव्हाही रोख पैशांची आवश्यकता असेल, तेव्हा बँकेमध्ये जाऊन, गर्दीच्या वेळी रांगेमध्ये उभे राहण्यात वेळ वाया घालविण्याची आवश्यकता नाही. आता कुठल्याही एटीएम मशीनमधून आपल्या डेबिट कार्डद्वारे पैसे काढण्याची सोय अगदी खेड्या-पाड्यांतूनही सहज उपलब्ध आहे. एटीएम मशीनमधून पैसे काढण्याची प्रक्रिया आता खूप सोपी झाली असली, तरी अनेकांना या प्रक्रियेतील बारकावे पूर्णपणे माहिती असतातच असे नाही. त्यामुळे अनेकदा एटीएममधून पैसे काढत असताना कार्ड अडकणे, खराब होणे, पैसे काढले गेल्याचा मेसेज मोबाईलवर आला तरी प्रत्यक्षात पैसे हाती न येणे अशा घटनांनी गोंधळ उडणे स्वाभाविक आहे. त्यामुळे एटीएम मशीन्सबद्दल अधिक माहिती करून घेणे अगत्याचे आहे.

ज्या काळी एटीएम मशीन्स नुकतीच अस्तित्वात आली होती, त्याकाळी या मशीन्समध्ये ‘कॅश रीट्रॅक्शन’ची सोय करण्यात आली होती. म्हणजेच एखाद्याने एटीएम मधून ‘withdrawl’ केल्यानंतर मशीनमधून बाहेर आलेले पैसे त्वरित न स्वीकारल्यास ठराविक सेकंदांच्या अवधीनंतर हे पैसे पुन्हा मशीनमध्ये परत पाठविले जात असत, आणि पुनश्च ग्राहकाच्या खात्यामध्ये जमा होत असत. मात्र रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आदेशान्वये ही सुविधा २०१२ सालानंतर काढून टाकण्यात आली. त्याकाळी या सुविधेमुळे अनेक गैरव्यवहार होत असल्याचे उघडकीला आल्याने ही सुविधा काढून टाकण्यात आली होती. आता ही सुविधा काढून टाकण्यात आल्यानंतर एटीएम मशीनमधून बाहेर येणारे पैसे मशीनच्या कलेक्शन ट्रेमधेच राहतात. त्यामुळे एखादी व्यक्ती जर पैसे घेण्यास विसरली, तर हे पैसे इतर कोणाच्याही हाती लागण्याचा धोका असतो. तसेच अशा प्रसंगी झालेल्या नुकसानाला बँक जबाबदार रहात नाही. हा धोका टाळण्यासाठी एटीएम मशीनच्या बाहेर पैसे दिले गेल्याची, आणि ग्राहकने ते पैसे ट्रेमधून उचलून घेण्याची सूचना देण्यासाठी मशीनमधून एका विशिष्ट प्रकारचा ‘बीप’ वाजण्याची सोय केलेली असते.

काही काळापूर्वी अस्तित्वात असलेल्या एटीएम मशीनमध्ये पैसे काढण्यास्ठी डेबिट कार्ड घातले असता, हे कार्ड मशीनच्या पूर्णपणे जाऊन प्रोसेस होत असे. क्वचित हे कार्ड मशीनमधेच अडकून बसत असे. पण आताच्या काळामध्ये सर्व एटीएम मशीन्स ‘रीकॅलिब्रेट’ करण्यात आली असल्यामुळे, आणि आताची डेबिट कार्डही चिपयुक्त असल्याने मशीनच्या आतमध्ये कार्ड जाणे आणि ते तिथेच अडकून बसणे यासारख्या समस्या फारशा उद्भवत नाहीत. आताच्या काळामध्ये अस्तित्वात असलेली चिपयुक्त कार्ड मशीनमध्ये घातली गेल्यानंतर मशीनमध्ये हे कार्ड ‘लॅच’ होते, आणि पैसे काढण्याची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच हे कार्ड मशीनमधून बाहेर काढता येते. जर पैसे काढण्याची प्रक्रिया सुरु असताना कार्ड जबरदस्तीने बाहेर ओढून काढण्याचा प्रयत्न केला गेला, तर या कार्डवरील चिपला नुकसान होऊन कार्ड निकामी होऊ शकते. जेव्हा पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण होते, तेव्हा जिथे कार्ड ‘इन्सर्ट’ केले जाते तिथे असलेल्या दिव्याची होणारी उघडझाप, कार्ड काढले जाण्याची सूचना देत असते.

अनकेदा पैसे काढण्यासाठी मशीनमध्ये कार्ड घातले जाते, पिन नंबर एन्टर करून रक्कमही भरली जाते, आणि पैसे बाहेर येण्याच्या वेळी नेमकी एटीएम मशीनची स्क्रीन ‘ब्लँक’ होऊन जाते, किंवा मशीनच्या स्क्रीनवर ‘एरर मेसेज’ दिसतो. तो पर्यंत मोबाईल फोनवर ही ‘withdrawl’चा मेसेज आलेला असतो, पण मशीनमधून पैसे बाहेर आलेले नसतात. अशा वेळी आपला गोंधळ उडणे स्वाभाविक असते. मात्र अशा वेळी घाबरून जाण्याची गरज नसते. एटीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड कोणत्याही वेळी उद्भवू शकतात. अशा वेळी या बिघाडांची जबाबदारी संबंधित बँकेची असते. जर पैसे काढण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसताना एटीएम मशीनमध्ये बिघाड झाला, तर आपण केलेली ही ‘transaction’ आपोपाप रद्द होऊन आपण मागितलेली रक्कम आपल्या खात्यामध्ये त्वरित पुन्हा जमा होते. ही सुविधा प्रत्येक एटीएम मशीनमध्ये आधीपासूनच ‘program’ केलेली असते. त्यामुळे खात्यामध्ये पैसे पुन्हा जमा झाल्याचा मेसेजही त्वरित येत असतो. मात्र असे न झाल्यास आपला ‘transaction’ क्रमांक बँकेला शक्य तितक्या लवकर कळवून संबंधित घटनेची माहिती देणे आवश्यक असते.

Leave a Comment