या सर्कसमध्ये जिवंत प्राण्यांच्या ऐवजी वापरले जात आहेत प्राण्यांचे ‘हॉलोग्राम्स’


सर्कस म्हटले, की निरनिराळे चित्तथरारक खेळ करणारे, रंगेबिरंगी पोशाख परिधान केलेले अतिशय आकर्षक आणि चपळ तरुण-तरुणी, आपल्या करामतींनी पोट धरून हसायला लावणारे गमत्ये विदुषक आणि रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर खेळ करणारे वाघ, सिंह, हत्ती, रंगेबिरंगी पोपट इत्यादी प्राणी, हे दृश्य हटकून आपल्या डोळ्यांसमोर उभे राहते. प्राण्यांचे खेळ हे सर्कशीचे नेहमीच प्रमुख आकर्षण ठरत आले आहेत, मात्र सर्कशीमध्ये ठेवल्या जाणाऱ्या या प्राण्यांना बहुतेकवेळी अतिशय अमानवी वर्तनाला तोंड द्यावे लागत असते. बंदिवासामध्ये या प्राण्यांवर होणारे अत्याचार पाहता अलीकडच्या काळामध्ये मनोरंजनाचे साधन म्हणून सर्कसमध्ये प्राणी बाळगण्यावर आणि प्राण्यांच्या खेळांवर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे.

सर्कसमध्ये प्राण्यांचे खेळ जसे बंद झाले तसे सर्कसचे मुख्य आकर्षणच नष्ट झाले आणि परिणामी सर्कशींची लोकप्रियता कमी होऊ लागली. सर्कशीची लोकप्रियता ही पुन्हा पहिल्यासारखी वाढावी आणि प्राण्यांचा दुरुपयोगही केला जाऊ नये या दोन्ही गोष्टींचा विचार करीत जर्मनीतील ‘सर्कस रोनाकॅली’ने एक नवा आणि अनोखा मार्ग शोधून काढला आहे. या सर्कसमध्ये आता जिवंत प्राणी वापरले जाण्याच्या ऐवजी प्राण्यांच्या ‘थ्री डी हॉलोग्राम्स’चा वापर करण्याची कल्पना अंमलात आणून आपल्या सर्कसकडे केवळ देशाचेच नाही, तर संपूर्ण जगाचे लक्ष आकृष्ट करून घेतले आहे.

अशा प्रकारे प्राणी-पक्ष्यांचे थ्री डी हॉलोग्राम्स वापरून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी सर्कस रोनाकॅली ही जगातली सर्वप्रथम आणि एकमेव सर्कस ठरली आहे. हे थ्री डी हॉलोग्राम्स तयार करण्याच्या कामी ‘ब्ल्यू बॉक्स’ आणि ‘ऑप्टोमा’ या कंपन्यांची मदत घेण्यात आली असून या कंपन्यांनी प्राण्या-पक्ष्यांची अतिशय सुंदर प्रोजेक्शन्स तयार केली आहेत. त्यामुळे हॉलोग्राम्सच्या रूपात सर्व प्राणी आणि पक्षी सर्कसमध्ये पाहण्याचा आनंद आता प्रेक्षकांना घेता येत आहे. १९७६ साली सुरु झालेल्या सर्कस रोनाकॅलीच्या या अभिनव कल्पनेचे सर्वत्र कौतुक होत असून, या कल्पनेला प्रेक्षकांचाही उत्तम प्रतिसाद लाभत आहे.

Leave a Comment