उद्यापासून बिकानेरमधून घरोघरी जाऊन लसीकरण मोहिमेला सुरुवात


जयपूर : राजस्थान सरकारच्या वतीने लसीकरणाच्या कार्यक्रमाला गती देण्यासाठी अनेक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर बिकानेर प्रशासनाने आता व्हॅक्सिनेशन ड्राईव्ह सुरु केले असून या मोहिमेला सोमवारपासून सुरुवात होणार आहे. या मोहिमेअंतर्गत, 45 वर्षावरील नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस देण्यात येणार आहे. त्सासाठी एका मोबाईल टीम तयार करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाने या मोहिमेसाठी एक हेल्पलाईन नंबरही जारी केला आहे. या हेल्पलाईन नंबरच्या आधारे लसीकरणासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यात येऊ शकेल. यामध्ये ही मोबाईल व्हॅन किमान दहा लोकांचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर लसीकरणासाठी त्या लोकांच्या घरी जाईल आणि त्यांचे लसीकरण पूर्ण करेल. या ड्राईव्ह सोबत एक मेडिकल स्टाफचीही नियुक्ती करण्यात आली आहे, जी लस घेणाऱ्या व्यक्तीचे लस घेतल्यानंतर काही वेळ ऑब्जर्वेशन करेल.

सध्याच्या घडीला बिकानेरमध्ये 16 प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. या आरोग्य केंद्रातील सर्व डॉक्टरांना सांगण्यात आले आहे की ज्या लोकांना लस देण्यात आली आहे, त्या लोकांच्या आरोग्याकडे काही काळापर्यंत लक्ष द्यावे. बिकानेर जिल्ह्यामधील 60 ते 65 टक्के लोकांचे आतापर्यंत लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये तीन लाख 69 हजार लोकांना लस देण्यात आली आहे.

देशातील वयोवृद्ध नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन लस द्याव्यात हा मुद्दा अनेकदा चर्चेत आला आहे. मुंबई उच्च न्यायालयानेही केंद्र सरकारकडून त्यावर मत मागवले होते. त्यावर केंद्र सरकारने सध्यातरी घरोघरी जाऊन लसीकरण करता येणार नाही असं सांगितले होते.