काल दिवसभरात नव्या बाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्यांची संख्या दुपटीहून जास्त


नवी दिल्ली : भारतातील आरोग्य यंत्रणांसमोर कोरोना रुग्णांची लाखोंच्या संख्येने होणाऱ्या वाढीमुळे आव्हान उभे राहिले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणा कोलमडते की काय अशीच भीती प्रशासनालाही होती. पण, अखेर कहर माजवणारी कोरोनाची दुसरी लाट आता देशातून काही अंशी ओसरतानाचे चित्र केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार काल दिवसभऱात देशात 80834 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर, 1,32,062 रुग्णांनी या संसर्गावर यशस्वीरित्या मात केली. काल दिवसभरात 3,303 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला. रग्णंख्येचे हे आकडे पाहता मागील 24 तासांत नव्या रुग्णांपेक्षा बरे होऊन घरी परतणाऱ्या रुग्णांचे प्रमाण दुपटीहून जास्त आहे हेच स्पष्ट होत आहे.

देशातील सक्रिय रुग्णसंख्येतही काही अंशी घट झाली असली तरीही कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करण्यात तसुभरही हलगर्जीपणा साऱ्या देशाला पुन्हा धोक्याच्या दरीत लोटू शकतो. त्यामुळे शक्य त्या सर्वच मार्गांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्याचबरोबर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत लागू करण्यात आलेले निर्बंधही फार कमी प्रमाणातच शिथिल करण्याला यंत्रणांचे प्राधान्य दिसत आहे.

तर महाराष्ट्रात शनिवारी 10,697 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 14,910 कोरोनाबाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज 360 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आकडेवारीत रोजच्या रुग्णवाढीपेक्षा बरे होऊन घरी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे, काल ही संख्या कमी नोंदवण्यात आली होती.