आगामी काही महिन्यात पेट्रोल सव्वाशे तर डिझेल शंभरी पार करणार, तज्ज्ञांनी वर्तवले भाकित


पुणे : आगामी दोन महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढतील. पेट्रोल सव्वाशे तर डिझेलच्या किमती शंभरच्या पुढे जातील, असे पेट्रोलियम क्षेत्रातील तज्ज्ञांनी भाकित वर्तवले आहे. एकीकडे या किमती वाढत असताना पेट्रोल-डिझेल डिलर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी वाढणाऱ्या या दरांबद्दल बोलणे बंद केले आहे.

शंभरी पार केलेले पेट्रोलचे दर आणखी वेगाने पुढे निघाले आहेत तर डिझेलचे दर शंभरीकडे वाटचाल सुरु आहे. देशात येत्या दोन महिन्यामध्ये कोणत्याही निवडणुका नसल्यामुळे पेट्रोलचे दर प्रति लिटर सव्वाशे रुपयांपर्यंत पोहोचतील, असे भाकित पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर बारकाईने लक्ष ठेऊन असलेल्या तज्ज्ञांनी वर्तवले आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाच्या दरांवरुन पेट्रोल आणि डिझेलचे हे दर ठरत आहेत. त्याचा आपल्याशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केंद्र सरकारकडून केला जातो. मग आंतरराष्ट्रीय बाजारपेठेला भारतात निवडणुका असल्यावरच दर कमी करायला कसे कळते, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीवर असे राजकारण होत असल्यामुळे नक्की दर कशामुळे वाढत आहेत याबाबत सामान्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. पण सध्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किमंत प्रति बॅरल सत्तर रुपये आहे. जेव्हा हे दर 120 ते 130 रुपये होते, तेव्हा पेट्रोल सत्तरच्या आसपास होते.

पेट्रोल आणि डिझेल असोसिएशनही पेट्रोल आणि डिझेलच्या या दरांबाबत पेट्रोलपंप चालकांची संघटना आतापर्यंत माहिती देत होती. पण या संघटनेचे पदाधिकारी देखील आता माहिती देण्यास धजावत नसल्यामुळे या पदाधिकाऱ्यांवर दबाव आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. पण बोलायचे थांबल्यामुळे दर वाढायचे थांबणार नाहीत हे सगळेच जाणून आहेत. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या या दरांमुळे सर्वसामान्यांच्या आयुष्याचे गणित कोलमडून पडणार आहे, एवढे मात्र नक्की आहे.