जाणून घेऊ या जपान देशाबद्दल काही रोचक तथ्ये


परंपरांचे पालन करण्याबाबत आग्रही, वक्तशीरपणा, आणि इतरांच्या प्रती मनामध्ये असलेला आणि वर्तनाद्वारे व्यक्त होणारा आदरभाव ही जपानी लोकांची खासियत आहे. अतिशय समृद्ध इतिहास, अगत्याने जोपासली गेलेली संस्कृती, परंपरा आणि प्रगत तंत्रज्ञान यांचा सुंदर मेळ पाहण्यासाठी जपानला प्रत्येकाने आयुष्यामध्ये एकदा तरी भेट नक्की द्यावी. मात्र हा सुंदर मेळ घडवून आणण्याचे कामी या देशाच्या नागरिकांची वर्षानुवर्षांची अपार मेहनत आहे. अशा या देशाबद्दल काही रोचक तथ्ये जाणून घेऊ या.

वक्तशीरपणा ही या देशाची खासियत आहे. केवळ या देशाचे नागरिकच नाही, तर येथील सार्वजनिक वाहनव्यवस्था देखील वक्तशीरपणाचा आदर्श नमुना म्हटली पाहिजे. जपानमधील एखादी ट्रेन काही सेकंद जरी उशीराने आली, किंवा काही सेकंद उशीराने निघाली, तर त्या ट्रेनने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना तसे प्रमाणपत्र देण्यात येऊन ट्रेन वेळेवर न आल्याबद्दल किंवा वेळेवर न निघाल्याबद्दल प्रमाणपत्राच्या द्वारे लिखितरूपात माफी मागितली जाते. ट्रेन उशीरा निघाल्याने किंवा पोहोचल्याने कामावर पोहोचण्यास उशीर झाल्यास हे प्रमाणपत्र प्रवासी आपापल्या ऑफिसेसमध्ये दाखवू शकतात.

जपानमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण नगण्य असून, येथील नागरिकांसाठी आणि येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी हा देश संपूर्ण सुरक्षित आहे. आश्चर्याची गोष्ट अशी, की जपानमध्ये घडणाऱ्या गुन्ह्यांमध्ये सुमारे वीस टक्के गुन्हे ज्येष्ठ नागरिकांच्या हातून घडत असतात. जपान मध्ये कायदेव्यवस्था अतिशय कडक असून, कायद्याचे पालन कसोशीने केले जाते. म्हणूनच या देशामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण अतिशय कमी आहे. किंबहुना जपानमध्ये फारसे गुन्हे घडत नसल्याने पोलिसांना त्यांचे काम क्वचित कंटाळवाणे ही वाटू लागत असल्याचे म्हटले जाते. येथे असलेल्या कायद्याच्या अनुसार सर्व कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पुरेशी विश्रांती मिळेल हे पाहणे कंपन्यांसाठी अनिवार्य असून, दर महिन्यातील शेवटच्या शुक्रवारी दुपारी तीन वाजता कर्मचाऱ्यांना कामावरून सुट्टी देणे अनिवार्य आहे. मात्र जपानी लोक जात्याच ‘workoholiks’ असल्याने आपल्या हक्काच्या रजा देखील न घेण्याबद्दल या लोकांची ख्याती आहे.

जपान मधील रस्त्यांवर कुठेही कचरापेट्या ठेवलेल्या आढळत नाहीत. पण स्वच्छतेचे वेड येथील नागरिकांचा आणखी एक गुण आहे. केवळ स्वतःची घरे नाही, तर सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवण्याबद्दल सर्वच नागरिक अतिशय जागरूक असतात. या देशामध्ये ‘वेस्ट मॅनेजमेंट’ अतिशय प्रभावी पद्धतीने केले जात असून, बायोडीग्रेडेबल, इलेक्ट्रॉनिक, आणि नॉन बायोडीग्रेडेबल अशा प्रकारांमध्ये कचऱ्याचे विभाजन केले जात असते. जपान तेथील ‘किंत्सुगी’ नामक कलेकरिता प्रसिध्द आहे. यामध्ये घरातील तुटलेल्या सिरॅमिकच्या वस्तू टाकून न देता त्या सोन्याच्या तारेने चिकटवत परत जोडल्या जातात. तुटलेल्या सिरॅमिकच्या वस्तूंचे सोन्याचे जोड दिसणे अतिशय महत्वाचे मानले जात असून, आयुष्यातील अनेक खडतर प्रसंगांची आठवण हे जोड करून देत असल्याचे म्हटले जाते.

Leave a Comment