नोकरी मिळविण्यासाठी येथे पास करावी लागते अनोखी परीक्षा


नोकरीसाठी मुलाखत म्हटले, की त्यामध्ये विचारले जाणारे प्रश्न, आपण त्याची समाधानकारक उत्तरे देऊ शकू किंवा नाही याबद्दल आपल्या मनामध्ये असणारी शंका हे चित्र आपल्यापैकी अनेकांनी अनुभवले असेल. मात्र ‘xero’ या न्यूझीलंड स्थित ऑस्ट्रेलियन अकाऊंटिंग सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी मिळवायची असेल, तर येथे एका अनोख्या परीक्षेला तोंड द्यावे लागते. जर या परीक्षेमध्ये एखादा असफल ठरला, तर त्याला नोकरी गमवावी लागतेच, शिवाय त्याची प्रोफाईल कंपनीद्वारे ‘ब्लॅकलिस्ट’ ही केली जाते.

या कंपनीच्या प्रमुखांनी अलीकडेच या आगळ्या वेगळ्या परीक्षेबद्दल खुलासा केला. या परीक्षेचे नाव ‘कॉफी कप टेस्ट’ असून, या टेस्टमध्ये असफल होणाऱ्याला अर्थातच नोकरी गमवावी लागते. कंपनीच्या प्रमुखांच्या मतानुसार एखादी व्यक्ती एखाद्या प्रश्नाचे बरोबर उत्तर देते की चूक हे पाहणे महत्वाचे नसून, या व्यक्तीच्या सवयी, त्याची विचार करण्याची पद्धत आणि त्याचे वर्तन आपल्या दृष्टीने जास्त महत्वाचे असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. एका कार्यक्रमामध्ये बोलताना xeroचे मॅनेजिंग डायरेक्टर ट्रेंट इंनेस यांनी आपल्या या छोट्याशा, पण रोचक चाचणीविषयी माहिती दिली.

एखादा कॅन्डीडेट नोकरीसाठी मुलाखत देण्यासाठी आला असता आपण त्याला ऑफिसमध्ये लहानशा कीचन एरियामध्ये घेऊन जात असल्याचे ट्रेंट यांनी सांगितले. किचनमध्ये गेल्यानंतर ट्रेंट स्वतःसाठी कॉफी बनवून घेतात आणि मुलाखतीसाठी आलेल्या कॅन्डीडेटलाही कॉफीसाठी आग्रह करतात. इथूनच त्या कॅन्डीडेटची खरी परीक्षा सुरु होते. ट्रेंट कॉफी हाती घेऊन बोलत बोलत किचनच्या बाहेर येतात. त्यांच्या मागोमाग कॅन्डीडेटही अर्थातच आपल्या कॉफीचा कप घेऊन किचनच्या बाहेर पडतो. त्यानंतर ऑफिसमध्ये बसून कॉफी पिताना अनेक अवांतर विषयांवर चर्चा होते. त्यानंतरची पायरी कॅन्डीडेटच्या दृष्टीने अतिशय महत्वाची असते, पण त्याची कल्पना अर्थातच कॅन्डीडेटला स्वतःला नसते. ट्रेंट मात्र या कॅन्डीडेटचे फार बारकाईने निरीक्षण करीत असतात.

मुलाखत संपल्यावर जाण्यास सांगितल्यानंतर जर त्या कॅन्डीडेटने स्वतःचा कॉफी प्यायलेला कप पुन्हा उचलून किचनमध्ये नेऊन धुवून ठेवला, तर हा कॅन्डीडेट नोकरीसाठी उत्तम समजला जातो. ट्रेंटच्या मते अशा व्यक्ती प्रत्येक कामातील बारकावे समजून घेऊन ते काम पूर्ण करणाऱ्या असतात. एखाद्या कामाला सुरुवात केल्यानंतर ते काम अर्धवट सोडण्याची मानसिकता अशा व्यक्तींमध्ये नसते. अशा व्यक्ती साधी कॉफी जरी पीत असल्या, तरी कॉफी पिऊन संपल्यावर या व्यक्ती ताबडतोब कप उचलून, धुवून जागेवर ठेवतात. अशा वर्तनातून त्या व्यक्तीची, हाती घेतलेले प्रत्येक काम पूर्ण करण्याची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे या कॉफी कप टेस्ट मध्ये पास होणाऱ्या होतकरू कॅन्डीडेट्सना अर्थातच ट्रेंट जास्त प्राधान्य देत असल्याचे म्हणतात.

Leave a Comment