
कोलकाता – भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष मुकुल रॉय यांची अखेर आज घरवापसी झाली असून मुकुल रॉय व त्यांचा मुलगा शुभ्रांशू रॉय यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यामुळे पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक निकालानंतर आता पुन्हा एकदा भाजपला मोठा झटका बसला आहे.
मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या उपस्थितीत मुकुल रॉय यांची मुलासह घरवापसी!
मुकुल रॉय यांनी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर, मी तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. सध्या जी परिस्थिती बंगालमध्ये आहे, त्या परिस्थितीत भाजपमध्ये कुणीही राहू शकत नसल्याचे माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
तर, तृणमूल काँग्रेसमध्ये भविष्यात मुकुल रॉय हे महत्वाची भूमिका निभावातील, असे म्हणत मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांचे स्वागत केले आहे. विधानसभा निवडणुकीनंतर पश्चिम बंगालची सत्ता तिसऱ्यांदा ममता बॅनर्जींच्या हाती आल्यानंतर अवघ्या काही दिवसातच भाजपवासी झालेले पूर्वाश्रमीचे तृणमूल काँग्रेसचे नेते स्वगृही परतणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामध्ये मुकुल रॉय यांचे नाव आघाडीवर होते. तसेच, रजीब बंदोपाध्याय यांच्यासह विधानसभेच्या माजी उपाध्यक्षा सोनाली गुहा यांच्या नावाची देखील चर्चा आहे.
टीएमसी सोडणारे मुकुल रॉय हे सर्वात पहिले नेते होते. तृणमूल काँग्रेसने पक्षविरोधी कारवायाच्या ठपका ठेवत त्यांना सहा वर्षांसाठी बाहेर केले होते. मुकुल रॉय हे टीएमसीमध्ये असताना ममता बॅनर्जी यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्वाचे नेते मानले जात होते. त्यांनी टीएमसी सोडत भाजपमध्ये प्रवेश केला होता. १९९८ पासून ते बंगालच्या राजकारणात आहेत.
