अमेरिकन कंपनीच्या यंत्राचा वापर करुन चवदारतळ्याच्या शुध्दीकरणाच्या कामास सुरुवात


महाड – बुधवारपासून महाड येथील ऐतिहासिक चवदार तळ्याच्या जलशुध्दीकरणाच्या कामास सुरुवात झाली असून हे जलशुध्दीकरणाचे काम एका अमेरिकन कंपनीच्या यंत्राद्वारे करण्यात येत आहे. दरवर्षी राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा असलेल्या चवदार तळ्याचे पाणी खराब होत असते. त्यामुळे २० मार्च रोजी चवदार तळे सत्याग्रहच्या वर्धापन दिनी येणाऱ्या जनतेला हे पाणी पिता येत नाही. निवडणुकीअगोदर नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी त्या पार्श्वभूमीवर हे जलशुद्धीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी चवदार तळ्याच्या पाण्याचे चांगल्या प्रकारे शुध्दीकरण केले जाईल, असे आश्वासन दिले होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती दिनानिमित्त प्राप्त झालेल्या अनुदानातून हे जलशुध्दीकरणाचे काम करण्यात येत आहे. त्यामुळे महाडकरांसह जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे. चवदारतळे जलशुध्दीकरणासाठी सामाजिक व न्याय विभागाकडून महाड नगरपरिषदेला १ कोटी ३७ लक्ष रुपयांचे अनुदान प्राप्त झाले आहे. हे काम त्याच्यातूनच करण्यात येत आहे.

लाँग डिस्टंन्स सर्क्युलेटर हे अमेरिकन कंपनीचे आधुनिक यंत्र या जलशुध्दीकरणासाठी पाण्यात सोडण्यात आले आहे. या यंत्राद्वारे व्हॅक्युम पंपाच्या सहाय्याने तळ्यातील पाणीवर खेचून त्याचे शुध्दीकरण केले जाणार आहे. पाण्यामध्ये ऑक्सिजन मिसळून साचलेली शेवाळ व अन्य कचरा कमी केला जाणार आहे. पाच वर्षे शुध्दीकरणाची ही प्रक्रिया सुरू राहणार असल्याचे सांगून ही प्रक्रिया करीत असताना तळ्यातील जैव विविधता व जीवांची हानी होणार नाही याची काळजीही घेतली जाणार असल्याची माहिती नगरअभियंता सुहास कांबळे यांनी दिली आहे.