सोमवारपासून उघडणार पुण्यातील मॉल्स, रात्री 7 वाजेपर्यंत खुली राहणार दुकाने


पुणे : पुणेकरांना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मोठा दिलासा दिला आहे. पुण्यातील मॉल्स सोमवारपासून (14 जून) उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सर्व दुकाने रात्री सात वाजेपर्यंत खुली राहतील. याशिवाय सोमवारपासून अभ्यासिका, वाचनालय सुरु करण्यास देखील परवानगी देण्यात आली आहे. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट पाचच्या खाली आल्यामुळे प्रशासनाने लगेच निर्बंध बदलले आहेत. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, असेही अजित पवार यांनी सांगितले.

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठक पार पडली. या बैठकीला प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. शहर अनलॉक केल्यानंतर ही पहिली बैठक होती. रुग्ण संख्येची परिस्थिती बघून आणखी शिथिलता देणार की निर्बंध कठोर केले जाणार याकडे लक्ष लागले होते. या बैठकीनंतर पुणेकरांच्या निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता देण्यात आली आहे.