श्रीलंका दौऱ्यासाठी शिखर धवन कर्णधार तर भुवनेश्वर कुमार उपकर्णधार


नवी दिल्ली : श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाने टीम इंडियाची घोषणा केली आहे. शिखर धवन या दौऱ्यात टीम इंडियाचे नेतृत्व करणार आहे, तर भुवनेश्वर कुमार हा संघाचा उपकर्णधार असणार आहे. आयपीएलमध्ये चमकलेल्या मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडसह वेगवान गोलंदाज चेतन सकारिया, नितीश राणा, देवदत्त पडिकल आणि कृष्णप्पा गौतम यांचा पहिल्यांदाच टीम इंडियात समावेश केला गेला आहे. जुलै महिन्यात भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका तर तीन सामन्यांची टी -20 मालिका खेळणार आहे.

भारतीय टीम श्रीलंकेमध्ये 13 ते 25 जुलै दरम्यान तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. 13, 16 आणि 18 जुलै रोजी एकदिवसीय तर 21, 23 आणि 25 जुलै रोजी टी 20 सामने खेळले जाणार आहेत. हे सामने कुठे खेळले जाणार याबाबत अद्याप घोषणा केलेली नाही.

श्रीलंका दौऱ्यात टीम इंडियामध्ये फलंदाजाच्या यादीत शिखर धवन, पृथ्वी शॉ, देवदत्त पडिकल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, इशान किशन आणि संजू सॅमसनला संधी मिळाली आहे. तर ऑलराउंडर म्हणून हार्दिक पांड्या, क्रुणाल पांड्या आणि के गौतम यांचा समावेश केला आहे. तर गोलंदाजांमध्ये भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, नवदीप सैनी, दीपक चहर, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, राहुल चहर आणि युजवेंद्र चहल यांना संधी मिळाली आहे.

भारतीय क्रिकेट इतिहासात असे पहिल्यांदाच असे होणार आहे की टीम इंडिया एकाच वेळी दोन सीरिज खेळणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टीम या दरम्यान इंग्लंड दौऱ्यावर आहे. तिथे टीम इंडिया न्यूझीलंडविरुद्ध आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅंपियनशिपची फायनल आणि त्यानंतर इंग्लंडविरोधात पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. तर दुसरीकडे याच काळात टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर असणार आहे. यामुळेच श्रीलंका दौऱ्यात त्याच खेळाडूंना जागा मिळाली आहे, जे भारतीय कसोटी संघात सहभागी नाहीत.