काँग्रेस प्रवेशासाठी भाजपमधील अनेक इच्छुक नेत्यांची मोठी लिस्ट तयार – नाना पटोले


अमरावती : राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांची एकत्रित सत्ता असली तरी काँग्रेस पक्ष आगामी निवडणुका स्वबळावर लढणार आहे. काँग्रेस पक्षाने यासाठी तयारी सुद्धा सुरू केली आहे. यासोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दावा केला आहे की, भाजपमधील अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छुक आहेत.

भाजपमध्ये काँग्रेस नेते प्रवेश करत आहेत या प्रश्नावर नाना पटोले यांनी म्हटले, अनेक लोक भाजपमधून काँग्रेस पक्षात येण्यास तयार आहेत, त्याची माझ्याकडे मोठी लिस्ट तयार आहे. नाना पटोले यांनी केलेल्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. काँग्रेस प्रवेशासाठी इच्छुक असलेले ते भाजप नेते कोण? असा सवालही विचारला जात आहे.

काँग्रेस आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तसेच विधानसभा निवडणूक स्वबळावर लढणार असल्याचे जाहीर करण्यात आल्यामुळे आघाडीत बिघाडी झाली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. तसेच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत व विधानसभा निवडणुकीत आघाडीत फूट पडणार असे दिसत आहे.

दरम्यान खासदार नवनीत राणा यांचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द झाले आहे. अमरावती लोकसभेसाठी पोट निवडणूक झाल्यास ती कोण लढवणार? या प्रश्नावर नाना पटोले म्हणाले, अमरावती लोकसभेची जागा काँग्रेसच्या कोट्यात असल्यामुळे अमरावतीची जागा काँग्रेस लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.