ठरलं; योगगुरु रामदेवबाबा घेणार कोरोना प्रतिबंधक लस


नवी दिल्ली – योगगुरु रामदेवबाबा यांनी अ‍ॅलोपॅथी औषधे आणि डॉक्टरांवर टीका केल्यानंतर आता पुन्हा एकदा घुमजाव केले आहे. आता योगगुरू रामदेव यांनी कोरोनावरील लस घेणार असल्याचे जाहीर केले आहे. त्याचबरोबर सर्वांना बाबा रामदेव यांनी लस घेण्याचे आवाहन देखील केले आहे. तसेच योग कोरोनापासून होणाऱ्या समस्या कमी करण्यास मदत करत असल्याचे देखील सांगायला विसरले नाहीत.

तर योग आणि आयुर्वेदचा अभ्यास होणे गरजेचे असल्याचे मतही यावेळी त्यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून देशातील १८ वर्षांवरील सर्वांचे मोफत लसीकरण केले जाईल, अशी घोषणा केली आहे. त्यानंतर योगगुरु यांनी लस घेण्याचे आवाहन केल्याने सर्वांचा भुवया उंचावल्या आहेत.

योगगुरु रामदेव यांनी पुन्हा एकदा औषध माफियांवर टीकास्त्र सोडले. संघटनेसोबत आमचे कोणतही शत्रूत्व नाही. देवाने पृथ्वीवर सर्व चांगले डॉक्टर पाठवलेले देवदूत आहेत. आमची लढाई डॉक्टरांसोबत नाही. जे डॉक्टर आमचा विरोध करताहेत. कोणत्याही संस्थेद्वारे ते करत नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. औषधांच्या नावाखाली कुणाला त्रास देऊ नका. लोकांनी अनावश्यक औषधांपासून स्वत:चा बचाव केला पाहीजे. अ‍ॅलोपॅथी आपातकालीन आजारांमध्ये आणि सर्जरीसाठी चांगली आहे. पंतप्रधानांना जनऔषधी दुकाने सुरु करावी लागली. कारण औषध माफियांकडून फॅन्सी दुकाने थाटली गेली आहेत. तिथे अनावश्यक औषधे जास्त किंमतींना विकली जात असल्याचेही त्यांनी पुढे सांगितले.