आमची दोस्ती जंगलातील वाघाशी होती, आता वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात आहे – चंद्रकांत पाटील


पुणे – राज्यातील शिवसेना आणि भाजप या दोन प्रमुख पक्षांमध्ये जेव्हा युती होती, तेव्हा सख्य आणि विरोधात असताना वैर हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. शिवसेनेसोबत असलेली युती तुटल्यापासून या दोन्ही पक्षांचे नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप किंवा टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. दोन्ही पक्षांमधील कलगीतुरा कोरोना काळातही सुरूच आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज वाढदिवशी शुभेच्छा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना देताना टोमणा मारला होता. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी देखील राऊतांना तितक्याच खोचक शब्दांमध्ये प्रत्युत्तर दिले आहे. आमची दोस्ती तर जंगलातील वाघाशी होती, आता हा वाघ पूर्णपणे पिंजऱ्यात असल्याचा खोचक टोला चंद्रकांत पाटील यांनी लगावला आहे.

चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये पत्रकारांशी बोलताना शिवसेनेला आणि संजय राऊत यांना देखील टोला लगावला आहे. माझा आज वाढदिवस असल्यामुळे कटू बोलायला नको. मला मनाविरुद्ध का होईना पण संजय राऊतांनी गोड म्हटले आणि शुभेच्छा दिल्या आहेत. मनामध्ये जर मी गोड असतो, तर साधारणपणे सामनाचा आठवड्याला एक अग्रलेख माझ्यावर लिहिला गेला नसता. मला काल एका कार्यक्रमात एका कार्यकर्त्याने एक वाघ भेट म्हणून दिला. मी म्हटले चांगले आहे, आमची वाघांशी दोस्ती आहे. तर त्यावर पत्रकारांनी शिवसेनेचा मुद्दा काढला. मी म्हटले दोस्ती करण्याचा आम्ही नेहमीच प्रयत्न करत असतो. पण आम्ही जंगलात असणाऱ्या वाघाशी दोस्ती करतो, पिंजऱ्यातील वाघाशी नाही. वाघ जोपर्यंत पिंजऱ्याच्या बाहेर होता, तोपर्यंत आमची दोस्ती होती. आता तो पूर्णपणे पिंजऱ्यातला वाघ झाला असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले.

दरम्यान, चंद्रकांत पाटील यांना संजय राऊत यांनी वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा दिल्या. यावेळी, चंद्रकांत पाटलांच्या कालच्या वाघासंदर्भातील विधानावरून त्यांनी टोला देखील लगावला होता. चंद्रकांत पाटील हे गोड आहेत. त्यांना अशाच प्रकारे कार्यकर्त्यांच्या भेटी घेत राहाव्यात. वाघ ठरवेल की मैत्री कुणाशी करायची, असे संजय राऊत म्हणाले होते.

दरम्यान, मुंबईत बुधवारी पडलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले. यावरून देखील चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. मुंबई महानगर पालिकेमध्ये गेल्या २० वर्षांहून जास्त कालावधी शिवसेनेचे राज्य आहे. राज्यातही दीड वर्षापासून त्यांचेच राज्य आहे. ४० हजार कोटींचे बजेट असतं. ५८ हजार कोटींच्या एफडी आहेत. पण मुंबईकर पूर्णपणे असुरक्षित आहेत. किती जण या पावसाळ्यात मॅनहोलमध्ये पडतात. त्यामुळे लोकच येत्या महानगरपालिका निवडणुकीत त्यांना धडा शिकवतील, असे ते म्हणाले.