महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; नियमित पीक कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार बिनव्याजी कर्ज


मुंबई : महाराष्ट्रातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तीन लाखांपर्यंत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळणार आहे.

आज मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना 3 लाखांपर्यंतचे पीककर्ज बिनव्याजी उपलब्ध करण्याची घोषणा यंदाच्या अर्थसंकल्पात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. राज्य मंत्रिमंडळाने आज त्या घोषणेची अंमलबजावणी करण्याच्या निर्णयाला मान्यता दिली.

पीककर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे 3 लाख रुपयांपर्यंतचे पीककर्ज शून्य टक्के व्याजदराने मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील या निर्णयासंदर्भात बोलताना म्हणाले की, 1 ते 3 लाखापर्यंत पीक कर्ज घेणाऱ्या आणि ते नियमित फेडणाऱ्या शेतकऱ्यांना बिनव्याजी कर्ज मिळणार आहे.

यापूर्वी 1 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळत होते. त्यावर 3 लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना 3 टक्के व्याज भरावे लागत होते. आता 3 लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज मिळणार आहे, असे ते म्हणाले. पाटील पुढे म्हणाले की, राज्यातील 45 लाख शेतकरी याचा फायदा घेऊ शकतात. यंदा सरकारने 60 हजार कोटीचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याचेही ते म्हणाले.