सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त यंत्रणांना सतर्क करावे; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश


सिंधुदुर्गनगरी – भारतीय हवामान खात्यामार्फत 9 जून ते 13 जून या कालावधीत जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सर्व विभागांची दूरदृष्यप्रणालीद्वारे जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी बैठक घेत आपल्या अधिनस्त यंत्रणेला सतर्क राहण्याची सूचना केली. विशेषतः सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामार्ग प्राधिकरणाने रस्ते खुले करण्यासाठी पथके तैनात ठेवावेत असे सांगितले.

जिल्ह्यात 9 जून ते 13 जून या कालावधीत मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. भारतीय हवामान खात्यातर्फे जारी करण्यात आलेल्या ताज्या बातमीपत्रानुसार या सर्व कालावधीत सिंधुदुर्गसह लगतच्या रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. या कालावधीत सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असून सोबतच मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी आज घेतलेल्या दूरदृष्यप्रणालीद्वारे बैठकीला पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर उपस्थित होते. तसेच प्रांताधिकारी, पोलीस अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, बंदर विभाग, पत्तन विभाग आदी सहभागी झाले होते.

जिल्हाधिकारी म्हणाल्या, हवामान खात्याने वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार होणाऱ्या मुसळधार, अतिमुसळधार पावसामुळे दरड कोसळून वा झाडे पडून रस्ते बंद झाल्यास तात्काळ ते खुले करण्यासाठी पथके तैनात ठेवावीत. समुद्रात कोणीही जाऊ नये यासाठी मत्स्य विभागाने सूचना द्यावी. नागरिकांनी ही योग्य ती खबरदारी घ्यावी, शक्यतो घरातून बाहेर पडू नये. त्याचबरोबर जिल्ह्यासाठी एनडीआरएफचे एक पथकही तैनात असणार आहे, असेही त्या म्हणाल्या.