Covaxin लस Beta आणि Delta व्हेरिएंटवर अधिक प्रभावी


नवी दिल्ली : भारतात सापडणाऱ्या डेल्टा व्हेरिएंट आणि बीटा व्हेरिएंटवर हैदराबादच्या भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस ही अधिक प्रभावी असल्याचे समोर आले आहे. ही गोष्ट पुण्याच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि भारत बायोटेकने एका संयुक्तपणे केलेल्या अभ्यासातून समोर आली आहे.

भारतातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला डेल्टा व्हेरिएंट हा जबाबदार असल्यामुळे भारतात कोरोनाबाधितांची संख्या आणि मृतांच्या आकड्यात मोठी वाढ झाली आहे. तर बीटा व्हेरिएंट हा पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेत सापडला होता.

अद्याप या तीन संस्थांनी केलेला अभ्यास प्रकाशित करण्यात आलेला नाही. या अभ्यासासाठी कोरोनातून बरे झालेले 20 रुग्ण आणि दोन्ही डोस घेऊन 28 दिवस झालेले 17 लोकांच्या सँपल घेण्यात आले होते. कोव्हॅक्सिनची ही लस या दोन व्हेरिएंटविरोधात अधिक प्रभावी असल्याचा दावा या अभ्यासात करण्यात आला आहे.

भारतात सापडलेल्या कोरोना व्हायरसचे जागतिक आरोग्य संघटनेने नामकरण केले आहे. भारतात सापडलेला B.1.617.1 हा कोरोना व्हेरिएंट ‘कप्पा’ आणि B.1.617.2 हा व्हेरिएंट आता ‘डेल्टा’ या नावाने ओळखला जाणार आहे. हे दोन व्हेरिएंट सर्वप्रथम भारतात सापडले होते. त्यानंतर सध्या 44 हून जास्त देशांत त्यांचा प्रसार झाला आहे.

डेल्टा हे व्हेरिएंट कप्पाच्या तुलनेत आणि जगातील इतर व्हेरिएंटच्या तुलनेत 50 टक्के जास्त वेगाने पसरत असल्याचे यामध्ये समोर आलं आहे. डेल्टा हा व्हेरिएंट भारतातील दुसऱ्या लाटेला प्रामुख्याने जबाबदार आहे. त्यामुळे मृतांची सख्या मोठ्या प्रमाणात वाढली. देशातील जवळपास प्रत्येक राज्यात हा व्हेरिएंट सापडला असून दिल्ली, महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, ओडिशा आणि तेलंगनामध्ये याचे प्रमाण जास्त आहे. भारतात सापडलेला कोरोना डेल्टा व्हेरिएंट हा सर्वाधिक धोकादायक असून तो एक चिंतेचा विषय असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे.