मॉन्सूनपूर्व पावसाचे मुंबईसह उपनगरात दमदार आगमन


मुंबई : मुंबईमध्ये आज मॉन्सूनची एन्ट्री होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता. पण मॉन्सूनने मुंबईत प्रवेश केला की, नाही, हे जरी जाहीर झालेले नसले तरी मुंबईत काल रात्रीपासूनच पावसाने हजेरी लावली आहे. रात्रभर पावसाने मुंबईला चांगलेच झोडपले आहे. हा पाऊस अद्यापही मुंबईच्या अनेक भागांत बरसत आहे. मुंबईतील पश्चिम उपनगरे म्हणजेच, अंधेरी, जोगेश्वरी, मालाड, गोरेगाव या उपनगरांमध्ये दमदार पाऊस होत आहे. तर मुंबईच्या पूर्व उपनगरांमध्ये मुलुंड, भांडूप, घाटकोपर, चेंबूर या परिसरातही पावसाची रिमझिम सुरु असून अधूनमधून जोरदार सरीही कोसळत आहेत.

मंगळवारी सकाळी महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि लगतच्या परिसरात पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. अशातच भारतीय हवामान विभागाने हा मॉन्सूनचा पाऊस नसून मॉन्सूनपूर्व पाऊस असल्याचे सांगितले आहे.

आज मुंबईत दक्षिण-पश्चिम मॉन्सून दाखल होऊ शकतो. आजपासून म्हणजेच, 9 जून ते 13 जून दरम्यान, मुंबई महानगर क्षेत्र आणि कोकणात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. हा अंदाज आता काहीप्रमाणात खरा ठरताना दिसत आहे. तर दुसरीकडे रायगड जिल्ह्यातही हायअलर्ट जारी करण्यात आला आहे. 10 आणि 11 जूनला रायगड जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन सतर्क झाले आहे. तसेच अतिवृष्टीच्या काळात नागरिकांना नदी, समुद्र आणि धरण परिसरात जाण्यास मनाई करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात शनिवारी दक्षिण-पश्चिम मॉन्सून पोहोचणार असल्याची आयएमडीने माहिती दिली होती. अशातच हवामान विभागाच्या अंदाजानुसार, शनिवारी रत्नागिरीत मान्सूने धडक दिली होती. मॉन्सूनसाठी अनुकूल परिस्थिती असूनही अद्याप मुंबईत मॉन्सूनने धडक दिली नाही. असे असले तरी मुंबईकरांच्या अंगाची लाही लाही करणाऱ्या उष्णतेपासून दिलासा मिळाला आहे. कारण कालपासूनच मुंबईत मॉन्सूनपूर्व पावसाच्या कोसळधारा पाहायला मिळत आहेत.