सलग दुसऱ्या दिवशीही देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत घसरण


नवी दिल्ली : देशातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या ही लाखाच्या आत आल्यामुळे काहीसा दिलासा मिळत असल्याचे चित्र आहे. देशात गेल्या 24 तासात 92 हजार 596 नवीन कोरोनाबाधितांची भर पडली असून 2219 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. काल एकाच दिवसात देशातील एक लाख 62 हजार 664 कोरोनाबाधित बरे झाले आहेत, म्हणजे एकाच दिवसात 72,287 सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

गेल्या 27 दिवसांपासून देशात सलग कोरोनाबाधित बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. देशातील रिकव्हरी रेट हा 94 टक्के एवढा आहे, तर मृत्यू दर हा 1.21 टक्के एवढा आहे. मंगळवारपर्यंत देशात 23 कोटी 90 लाख 58 हजार जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

गेल्या 74 दिवसांतील सर्वात कमी कोरोनाबाधितांची नोंद राज्यात मंगळवारी झाली आहे. काल राज्यात 10 हजार 891 नवीन कोरोनाबाधित रुग्णांचे निदान झाले. तर दिवसभरात 16,577 रुग्ण बरे होऊन घरी परतले. आजपर्यंत राज्यात एकूण 55,80,925 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 95.3 टक्के एवढे झाले आहे. दरम्यान आज 295 कोरोनाबाधितांच्या मृत्यूंची नोंद झाली. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.73 टक्के एवढा आहे.