या देशात मिळतो सर्वात स्वस्त इंटरनेट डेटा


आजकाल आपल्या आयुष्यात स्मार्टफोन, इंटरनेट हे महत्त्वाचे घटक झाले असून याच दरम्यान इंटरनेट, त्याचा स्पीड आणि त्यासाठी खर्च करावे लागणारे पैसे हा सर्वांनाच कायम पडलेला प्रश्न असतो. आजकाल डेटाचा वापर ओटीटी प्लॅटफॉर्म्समुळे तर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण इतर देशांच्या तुलनेत भारतात अतिशय कमी किंमतीत डेटा मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.

जगातील भारत हा एक असा देश आहे, ज्या ठिकाणी १ जीबी डेटासाठी सर्वात कमी पैसे मोजावे लागतात. तर दुसरीकडे असेही काही देश आहेत ज्या ठिकाणी एक जीबी डेटासाठी २ हजार रूपयांपर्यंत खर्च करावा लागतो. जगातील काही असेच काही देश आहेत, ज्या ठिकाणी १ जीबीसाठी सर्वात कमी आणि सर्वात जास्त पैसे द्यावे लागत आहेत. त्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.

व्हिजुअल कॅपिटललिस्टच्या एका अहवालानुसार सर्वात स्वस्त डेटा भारत, इस्रायल, किर्गिझस्तान, इटली आणि युक्रेन या देशांमध्ये दिला जातो. भारत या देशांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. भारतात एक जीबी डेटासाठी ०.०९ डॉलर्स म्हणजेच जवळपास साडेसहा रुपये द्यावे लागतात. दुसऱ्या क्रमांकावर इस्रायल आहे. इस्रायलमध्ये एक जीबी डेटासाठी ग्राहकांना ०.११ डॉलर्स म्हणजे जवळपास ८ रूपये द्यावे लागतात. तर किर्गिझस्तानमध्ये १ जीबी डेटासाठी जवळपास १५.३ रूपये, इटलीमध्ये जवळपास ३१.३८ रूपये आणि युक्रेनमध्ये जवळपास ३३.५६ रूपये द्यावे लागतात.

१ जीबी डेटासाठी ज्या देशांमध्ये सर्वाधिक पैसे खर्च करावे लागतात त्यामध्ये मालावी पहिल्या क्रमांकावर येतो. ग्राहकांना या ठिकाणी १ जीबी डेटासाठी २७.४१ डॉलर्स म्हणजेच जवळपास २ हजार रूपये द्यावे लागतात. बेनिनमध्ये ग्राहकांना एका जीबीसाठी जवळपास १९८६ रूपये, चॅडमध्ये जवळपास १७०० रुपये, तर येमेनमध्ये ११६६ रूपये आणि बोत्सवानामध्ये १०१२ रुपये आकारले जातात. अमेरिकेत ग्राहकांकडून १ जीबी डेटासाठी ८ डॉलर्स म्हणजेच जवळपास ५८३ रूपये आणि कॅनडामध्ये १२.५५ डॉलर्स म्हणजे जवळपास ९१६ रूपये आकारले जातात.